(म्हणे) ‘शांततेसाठी सर्व करार आणि शस्त्रसंधी यांचे कडक पालन करू !’ – पाकचे आश्‍वासन

पाकच्या सैन्याधिकार्‍यांकडून भारताला शांततेचा प्रस्ताव : भारताकडून सहमती

पाकच्या आश्‍वासनावर शेंबडे पोर तरी विश्‍वास ठेवील का ? चीन आणि पाक दोन्ही मिळून माघार घेतल्याचे दाखवून भारताच्या विरोधात कट रचत आहेत का ? याचा शोध भारताने घेत दोघांच्या संदर्भात सतर्क रहाणेच देशहिताचे आहे !

नवी देहली – पाकच्या मिलिट्री ऑपरेशन्सच्या डायरेक्टर जनरल (डी.जी.एम्.ओ.) यांनी भारताच्या डी.जी.एम्.ओ. यांच्याशी हॉटलाईनवर चर्चा करून शांततेचा प्रस्ताव ठेवला. ‘प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व करार आणि शस्त्रसंधी यांचे कडक पालन करू’, असे पाकच्या अधिकार्‍याने सांगितले. त्याला भारतानेही सहमती दिली आहे. ही शस्त्रसंधी २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील संघर्षानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर पाकला भीती वाटू लागल्याने त्याने हा प्रस्ताव ठेवल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

नियंत्रणरेषेविषयी याआधी जे काही करार झाले आहेत ते पाळण्याचे आश्‍वासन पाकने दिले आहे. तसेच कोणतीही अफवा किंवा अपसमज दूर करण्यासाठी हॉटलाईनवर चर्चा करण्याविषयीही दोन्ही जनरलनी सहमती दर्शवली आहे. तसेच सीमेवर फ्लॅग मिटिंग घेण्याचे ठरवले आहे.