भंडारा जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी २ परिचारिकांवर गुन्हा नोंद

भंडारा – ९ जानेवारी या दिवशी रात्री २ वाजता येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतीदक्षता नवजात केयर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या जळीत कांडाप्रकरणी परिचारिका शुभांगी साठवने आणि अधिपरिसेविका स्मिता आंबीलडुके या दोघींवर १९ फेब्रुवारी या दिवशी पहाटे ४ वाजता भारतीय दंड विधान संहिता कलम ३०४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नवजात केयर युनिटमध्ये एकूण १७ नवजात बालके होती. या विभागामध्ये ‘आऊट बॉर्न’ आणि ‘इन बॉर्न’ अशी २ युनिटे आहेत. यांपैकी ‘इन बॉर्न’मधील ७ बालके सुखरूप आहेत, तर ‘आऊट बॉर्न’ युनिटमधील १० बालंकांचा मृत्यू झाला होता. ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले होते. या प्रकरणी आरोग्य विभागाचा चौकशी अहवाल आल्यानंतर त्याप्रमाणे अस्थाई स्वरूपाच्या २ परिचारिका आणि १ बालरोग तज्ञ आधुनिक वैद्य यांना बडतर्फ, तर २ परिचारिका आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना निलंबित करण्यात आले होते, तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे स्थानांतर करण्यात आले होते.