११ मार्च २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व असणार आहे. यामध्ये उत्तराखंड शासनाने १ ते ३० एप्रिल या कालावधीत भाविकांसाठी कुंभपर्व कालावधी घोषित केला आहे. असे असले, तरी सामान्यतः ११ मार्च ते ३१ मार्च या कालावधीतही कुंभपर्व काळ असल्याने भाविक संख्या अधिक असणार आहे. या दृष्टीने या कुंभपर्वाच्या कालावधीत हरिद्वार येथील कुंभक्षेत्रावर धर्मप्रसार आणि हिंदु राष्ट्र जागृती अभियान व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत पुढील उपक्रम निश्चित करण्यात आले आहेत.
- १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत हरिद्वार शहरात ४ मोठी, तसेच फिरती ग्रंथप्रदर्शने प्रतिदिन लावणे आणि हरिद्वारमध्ये कुंभकाळात आलेल्या संतांना भेटून हिंदु राष्ट्र जागृती करणे : या धर्मसेवांसाठी एकूण ३५ साधकांची आवश्यकता आहे.
- २० मार्च ते ३१ मार्च या कालावधीत कुंभक्षेत्रात २ ठिकाणी लावण्यात येणारी चित्रमय धर्मशिक्षण फलक प्रदर्शन उभारण्याची प्रत्यक्ष शारीरिक सेवा करणे :या सेवेंतर्गत तंबू उभारणी, विद्युतकाम, सुतारकाम, कनात लावणे, प्रदर्शन लावणे अशा शारीरिक सेवा असणार आहेत. ही कौशल्ये असणार्या एकूण १० साधकांची आवश्यकता आहे.
- १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत २ चित्रमय धर्मशिक्षण प्रदर्शनांच्या द्वारे अध्यात्मप्रसार करणे, ४ फिरते ग्रंथप्रदर्शन लावणे, समविचारी संत, आध्यात्मिक संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक संघटना यांना हिंदु राष्ट्राचे कार्य सांगण्यासाठी संपर्क करणे, तसेच या काळात विविध धार्मिक मंडपांमध्ये हिंदु राष्ट्रविषयक व्याख्याने देणे आदी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. : या धर्मसेवांसाठी एकूण १०० साधकांची आवश्यकता आहे.
कुंभमेळ्याच्या सेवेसाठी जिल्हासेवकांच्या माध्यमातून नावनोंदणी करा !
जे या धर्मप्रसाराच्या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत, त्यांनी जिल्हासेवकांशी संपर्क साधावा. नोकरी करणार्यांनी शक्य असल्यास कार्यालयातून (ऑफिसमधून) रजा काढून या सेवेचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा. कुंभमेळ्याला न्यूनतम १५ दिवस सेवेत सहभाग घेणे आवश्यक आहे. तसेच हरिद्वार येथे दक्षिणेतील राज्यांतून येण्यासाठी २ – ३ दिवस लागतात.
या संदर्भात जिल्हासेवकांकडून निर्णय मिळाल्यानंतर लवकरात लवकर रेल्वेचे आरक्षण करणे अपेक्षित आहे. या काळात प्रचंड गर्दी असल्याने आयत्या वेळी रेल्वेची तिकिटे उपलब्ध होत नाहीत, हा अनुभव आहे. नाव निश्चित झालेल्या साधकांना जिल्हासेवकांकडून कुंभसेवेसाठीचा रजिस्ट्रेशन फॉर्म पाठवण्यात येईल. रेल्वेचे तिकीट काढल्यानंतर साधकांनी हा गूगल फॉर्म भरून नोंदणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. कुंभक्षेत्री साधकांचे निवास, सेवा-नियोजन आणि भोजन पथ्ये आदींसाठी नोंदणी प्रक्रिया आवश्यक आहे.
कुंभपर्वाच्या संदर्भात साधकांसाठी सूचना
१. आरोग्याच्या संबंधीच्या महत्त्वाच्या सूचना
अ. कुंभपर्वासाठी येऊ इच्छिणार्या साधकांची शारीरिक क्षमता चांगली असावी. सामान्यतः वय वर्षे १६ ते ६५ वयोगटातील साधक या सेवेत सहभागी होऊ शकतात. या सेवेसाठी मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि अस्थमा हे जुनाट रोग असलेल्या साधकांनी सहभागी होऊ नये.
आ. साधकांनी स्वतःच्या शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांची विस्तृत माहिती जिल्हासेवकांना द्यावी.
इ. जेवणामध्ये काही पथ्य असल्यास त्याची विस्तृत माहिती नोंदणी अर्जामध्ये (रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये) भरावी.
२. सरकारी निर्देशांचे पालन करावयाच्या काही सूचना
अ. उत्तराखंड सरकारने कुंभला येणार्या प्रत्येकाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे अनिवार्य केले आहे. या फॉर्मची लिंक पुढे दिली आहे. https://dsclservices.org.in/kumbh/
आ. वरील लिंकवरील फॉर्म भरतांना स्थायी पत्ता असलेल्या ओळखपत्राची संगणकीय प्रत (सॉफ्ट कॉपी) उदा. आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदान ओळखपत्र देणे आवश्यक आहे.
इ. कोविड निगेटिव्ह आर्.टी.पी.सी.आर्. टेस्टचा अहवाल. ही चाचणी अधिकतम ७२ घंट्यांपूर्वी करणे आवश्यक असून त्याची माहिती फॉर्ममध्ये देणे आवश्यक आहे.
ई. हेल्थ चेकअप रिपोर्ट हा स्थानिक डॉक्टरांकडून भरून घेऊन त्याची सॉफ्ट कॉपी फॉर्म भरतांना देणे अपेक्षित आहे.
उ. हरिद्वारमधील आपल्या निवासाचा पत्ता : दिव्यधाम, बॉम्बे स्कूलच्या जवळ, हरिपूर कलाँ, रायवाला, हरिद्वार
ऊ. आपल्या निवासाचा कालावधी : यात आपण किती निवास करणार आहोत, हे लिहिणे अपेक्षित आहे.
ए. मोबाईल स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावे असणे अपेक्षित आहे. स्मार्टफोन उपयोग करणार्यांनी आरोग्यसेतू अॅप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
ही सर्व माहिती भरल्यानंतर उत्तराखंड सरकार कुंभसाठी आपल्याला ऑनलाईन पास उपलब्ध करून देईल की, तो आणि वरील सर्व कागदपत्रे (स्थायी पत्ता असलेले ओळखपत्र, कोविड निगेटिव्ह आर्.टी.पी.सी.आर्. टेस्टचा अहवाल, हेल्थ चेकअप रिपोर्ट) स्वतःजवळ असणे आवश्यक आहे.
३. प्रवासासंबंधी सूचना
अ. हरिद्वार शहरात हरिद्वार रेल्वेस्थानक (HW), मोतीचूर रेल्वे स्थानक (MOTC), ज्यालापूर रेल्वेस्थानक (JWP), तसेच ऋषिकेश (RKSH) रेल्वेस्थानक या ठिकाणी रेल्वे गाड्यांचे थांबे आहेत. प्रत्येक गाडीला यापैकी वेगवेगळ्या स्थानकांसाठी अधिक आरक्षण असते. हे लक्षात घेऊन साधकांनी आरक्षणाची उपलब्धता लक्षात घेऊन तिकीट काढावे.
आ. काही राज्यांतून हरिद्वारसाठी रेल्वे गाड्या नाहीत; परंतु देहली येथे जाणारी रेल्वे आहे. अशा ठिकाणच्या साधकांनी देहली येथील देहली (DLI), नवी देहली (NDLS) आणि हजरत निजामुद्दीन (NZM) येथे येऊन त्याच रेल्वेस्थानकावरून पुढील हरिद्वारसाठीचे रेल्वे आरक्षण करावे. तसेच या रेल्वेस्थानकांवरून हरिद्वारसाठीचे पुढील रेल्वे आरक्षण करतांना दोन्ही प्रवासांत पुरेसा कालावधी राहील, याची निश्चिती करावी. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, पुणे आणि नाशिक येथील साधकांनी मुंबईहून थेट हरिद्वारची गाडी पकडल्यास त्यांना देहली येथे येण्याची आवश्यकता नाही.
इ. आयत्या वेळी आगगाडीचे तिकीट मिळणे कठीण आहे. तसेच सरकारी निर्देशानुसार विशेष कुंभ रेल्वे रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वांचे येण्या-जाण्याचे तिकीट कन्फर्म असावे.
ई. रेल्वे स्थानकावर साहित्याची चोरी होण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाने सतर्क रहावे आणि स्वतःच्या साहित्यावर लक्ष ठेवावे.
उ. प्रवासात सहप्रवाशांनी खाद्यपदार्थ वा पेय दिल्यास ते घेऊ नये.
ऊ. प्रवासात भ्रमणभाषचा अधिक वापर केल्यास भ्रमणभाषची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे इतरांना संपर्क करायला अडचण येेत असल्याने भ्रमणभाषचा आवश्यक तेवढाच वापर करावा. महत्त्वाचे भ्रमणभाष क्रमांक एका नोंदवहीत लिहून ती स्वतःजवळ ठेवावी. भ्रमणभाष डिस्चार्ज झाल्यास या नोंदवहीचा उपयोग होईल.
ए. रेल्वेस्थानकावर आगगाडीच्या खिडकीमधून पर्स किंवा भ्रमणभाष चोरीला जाण्याच्या घटना घडतात. त्यामुळे खिडकीजवळचे आसन असल्यास मौल्यवान वस्तू योग्य ठिकाणी ठेवाव्यात, तसेच भ्रमणभाषचा वापर सतर्कतेने करावा.
ऐ. ११ मार्च, १२, १४ आणि २७ एप्रिल या दिवशी कुंभपर्वातील मुख्य अमृतस्नान असणार आहे. स्नानांच्या दिवशी, तसेच स्नानाचे २ दिवस आधी आणि दुसर्या दिवशी कुंभक्षेत्राची वाहतूक थांबवली जाते. त्यामुळे साधकांनी त्या दिवसांमध्ये येण्या-जाण्याचे नियोजन करू नये. या दिवशी अंतर्गत गाड्या चालवणेही कठीण असते.
ओ. पुढील सूचना मिळेपर्यंत विमानाचे तिकीट काढू नये. विमानाने यायचे असल्यास त्यापूर्वी श्री. श्रीराम लुकतुके यांना संपर्क करावा.
४. सेवेला येतांना समवेत आणावयाचे साहित्य
अ. स्वतःचे शासकीय ओळखपत्र, उदा. वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), तसेच आधारकार्ड अवश्य आणावे. त्यांची एक झेरॉक्स प्रत घरी ठेवावी आणि एक स्वत: समवेतही आणावी.
आ. मार्चचे प्रथम २० दिवस थंडी असते. या थंडीसाठी आवश्यक कपडे, उदा. स्वेटर, जॅकेट, स्वेट टी-शर्ट, इनर, हॅण्ड ग्लोव्हज, सुती पायमोजे, कानटोपी आणावेत.
इ. स्वतःची औषधे समवेत आणावीत. प्रवासाचे दिवस धरून जितक्या दिवसांसाठी सेवेचे नियोजन केले आहे, त्या कालावधी व्यतिरिक्त ४ – ५ दिवसांची अधिक औषधे समवेत आणावीत.
ई. स्वतःसमवेत मौल्यवान वस्तू, उदा. सोन्याचे दागिने, आवश्यकतेपेक्षा अधिक रोख रक्कम आणू नये.
उ. कुंभपर्वासाठी येण्यापूर्वी सर्वांनी स्वतःच्या प्रत्येक वस्तूवर, उदा. भ्रमणभाष, प्रभारक (चार्जर), पेन, वही, चादर, उशी, हवेची उशी (एअर पिलो), स्वेटर इत्यादींवर नाव लिहावे किंवा चिकटवावे.
ऊ. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत आणणे आवश्यक आहे. या बाटलीवर स्वतःचे नाव लिहिणे आवश्यक आहे.
५. निवासाच्या संदर्भात
अ. कुंभपर्वासाठी साधकांची निवासव्यवस्था गंगा नदीच्या वाळवंटावर तात्पुरत्या स्वरूपाच्या राहुट्यांमध्ये (कापडाच्या तंबूमध्ये) केली जाईल.
आ. झोपण्यासाठी पलंगाऐवजी ब्लँकेटची व्यवस्था असेल. शक्य असल्यास स्वतःचे अंथरूण-पांघरूण समवेत आणावे.
इ. पाश्चात्त्य पद्धतीचे शौचालय उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
वरील सूचनांविषयी काही शंका असल्यास जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. श्रीराम लुकतुके यांना भ्र.क्र. ७०१२०८५१८४ यावर संपर्क करावा.
जिल्हासेवकांना सूचना
तीव्र आध्यात्मिक त्रास असून त्रासाचे प्रकटीकरण होणार्या, तसेच तीव्र शारीरिक त्रास असणार्या साधकांना कुंभसेवेला पाठवण्याचे नियोजन करू नये.
या संदर्भातील साधकांच्या माहितीचा गूगल फॉर्म जिल्ह्यांना शेअर करण्यात आला आहे. जिल्हासेवकांनी सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांची पूर्ण माहिती गूगल फॉर्ममध्ये भरावी.
कुंभपर्व काळात धन अथवा वस्तू स्वरूपात अर्पण करण्याची अमूल्य संधी !या कुंभपर्वाच्या काळात सत्पात्रे दानम् यानुसार दानधर्म केल्यास त्याचा साधनेसाठी १ सहस्र पटींनी लाभ होतो. या धर्मप्रसारसेवेत भारतभरातील १०० हून अधिक साधक सहभागी होणार आहेत. या सर्वांचा निवास, भोजन आदींसह अन्य अनेक गोष्टींची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी धन आणि वस्तू यांची आवश्यकता आहे. तरी सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि अर्पणदाते यांनी या धर्मप्रसाराच्या कार्यात यथाशक्ती दान (अर्पण) करावे, असे आवाहन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी केले आहे. यासाठी आपण सनातन संस्थेचे साधक किंवा हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक, तसेच वाचकांनी सनातन प्रभातचे वितरक यांच्याशी संपर्क साधावा. कुंभपर्वात कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे, याची सूची संबंधितांकडून आपल्याला उपलब्ध होईल. |