साधू-संत यांचा अवमान करणार्‍यांचा राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने निषेध

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १९ फेब्रुवारी (वार्ता.) – भ्रष्टाचारी पक्षाशी लांगेबांधे असणारे, तसेच विदेशी व्यक्तीवर निष्ठा असणार्‍या शासनकर्त्यांना साधूंचे महत्त्व काय कळणार ? साधूंविषयी वक्तव्य करणारे विजय वडेट्टीवार मौलाना किंवा पाद्री इत्यादींविषयी मूग गिळून गप्प बसतात. साधू-संत यांचा अवमान करणार्‍या शासनकर्त्यांचा राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत असून हिंदूंनी अशा शासनकर्त्यांना निवडून देणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारल्यासारखे आहे, असे मत राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडले आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काँग्रेसने नेहमीच हिंदूंची उपेक्षा केली आहे. श्रीराम, रामसेतू, संत, गोमाता यांचा द्वेष केला आहे. साधू-संतांचा आदर करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे शासनकर्ते मंत्रीपदावर असणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. साधू-संतांच्या कार्यक्रमाला आमंत्रण न देताही असंख्य लोक एकत्रित येतात; मात्र राजकीय नेत्यांना जनतेला एकत्रित करण्यासाठी पैसा, गाड्या, मद्य, भोजन इत्यादींची व्यवस्था करूनही नाईलाजाने लोक येतात. त्यामुळे लायक कोण आणि नालायक कोण ?, आहे हे जनतेला अधिक समजते.