माजी सरन्यायाधीश गोगोई यांच्याविरुद्धच्या लैंगिक छळाच्या आरोपाच्या अन्वेषणाची कार्यवाही बंद

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्धची कारवाई रद्द

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध त्यांच्याच एका माजी महिला कर्मचार्‍याने केलेले लैंगिक छळाचे आरोप, तसेच सर्वोच्च न्यायालयात खंडपिठांचे ‘फिक्सिंग’ करणे यामागील ‘व्यापक कटा’चे अन्वेषण करण्यासाठी चालू केलेली कार्यवाही सर्वोच्च न्यायालयाने बंद केली. ‘या प्रकरणाचे अंतर्गत अन्वेषण पूर्ण झाले असून सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यांच्या खंडपिठाने माजी सरन्यायाधिशांना दोषमुक्त करणारा अहवाल यापूर्वीच दिला आहे’, असे न्यायालयाने याप्रकरणी स्वत:हून चालू केलेली कार्यवाही बंद करतांना सांगितले.

१. न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणाला जवळजवळ २ वर्षे उलटली असून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड परत मिळवण्याची शक्यता अतिशय अल्प आहे. या कटाचे अन्वेषण  करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मिळवणे न्या. (निवृत्त) ए.के. पटनायक समितीला शक्य होऊ शकले नाही आणि त्यामुळे स्वत:हून चालू केलेले हे प्रकरण पुढे चालू ठेवून काहीही उद्देश साध्य होणार नाही.

२. गोगोई यांनी आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सिद्धता करण्यासह काही सूत्रांवर कठोर निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काही कट शिजला असावा, या गुप्तवार्ता विभागाच्या संचालकांच्या पत्राचा न्यायालयाने या वेळी उल्लेख केला.