चुकीच्या बातम्या, भ्रम आणि अफवा पसरवणे, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नव्हे ! – माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर

पुणे – देहलीमधील शेतकर्‍यांच्या आंदोलनात ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाला होता, तसे छायाचित्रणही समोर आले आहे; मात्र तो पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याचे एका प्रसिद्ध पत्रकाराने ट्वीट केले होते. त्यावर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी संताप व्यक्त करत ‘पत्रकारांनी अशा अफवा पसरवू नयेत आणि स्वतःचे दायित्व ओळखून सत्यता पडताळून मगच बातम्या द्याव्यात’, असे म्हटले आहे. त्यामुळे आपल्याच देशाची प्रतिमा मलीन होत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ८ फेब्रुवारी या दिवशी आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५५व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते.

जावडेकर पुढे म्हणाले की, सरकारला विरोध करतो; म्हणून आम्ही विरोध करणार नाही. उलट त्याचे स्वागत आहे. चुकीच्या बातम्या, भ्रम, अफवा पसरवणे, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यात नसते. आता जे ‘टूलकिट’चे प्रकरण समोर आले आहे, त्या माध्यमातून ज्या संघटनांनी योजना बनवल्या होत्या की, भारताला कसे अपकीर्त केले जावे, त्यांची पूर्ण माहिती मिळाली. भारत देश शक्तीशाली आहे. त्यामुळे देशाचे काही बिघडणार नाही. अशा षड्यंत्रांचा भारतावर परिणाम होणार नाही.