कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात रुग्णाला दिले कालबाह्य सलाईन

रुग्णांच्या जिवाशी खेळणारे रुग्णालय प्रशासन !

कोल्हापूर, ८ फेब्रुवारी – येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात ६ फेब्रुवारी या दिवशी कालबाह्य झालेले सलाईन रुग्णाला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याविषयी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे वैद्यकीय अधीक्षक विजय बर्गे यांनी सांगितले.

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील ७५ वर्षीय महादेव खंदारे यांना उपचाराच्या कालावधीत आधुनिक वैद्यांनी सिप्रोफ्लोक्सनीन इंजेक्शन आयपी हे औषध आणण्यासाठी सांगितले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना वैधता संपलेले औषध देण्यात आले. ही गोष्ट त्यांच्या मुलाने प्रशासनाच्या लक्षात आणून दिली असता त्यामुळे तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला का ? अशी उद्धट उत्तरे देण्यात आली. याविषयी संतप्त झालेल्या त्यांच्या मुलाने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे लेखी तक्रार केली. त्यावर या प्रकरणाची चौकशी ७ दिवसांत करून औषधालयातील संबंधित कर्मचारी, परिचारिका, तसेच त्या वेळी कामावर असणारे कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अधीक्षकांनी सांगितले.