‘शरजील उस्मानी याला बेड्या पडतीलच, निश्‍चिंत रहा !’  

दैनिक ‘सामना’मधून आश्‍वासन !

मुंबई – हिंदुद्वेषी शरजील उस्मानीसारखे कित्येक किडे-मकोडे आले आणि गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदु समाजाला अवमानित करणे, हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. शरजीलसारखे साप अलीगडच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले, तरी त्याला खेचून आणण्याचे धैर्य महाराष्ट्र पोलिसांत आहे, हे काय फडणवीस यांना माहीत नाही ? तेसुद्धा कालपर्यंत राज्यकर्ते होतेच. त्यांच्या मनात तरी महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शरजील याला बेड्या पडतीलच, निश्‍चिंत रहा, असे आश्‍वासन ४ फेब्रुवारीच्या दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून देण्यात आले आहे. शरजील याला अटक करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दैनिक ‘सामना’मधील अग्रलेखातून विरोधकांना निश्‍चिंत करण्यात आले आहे.

शरजील उस्मानी

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की,

१. ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातील प्रत्येक घटक सुरक्षित आहे; पण रस्त्यावर ३ मासांपासून लढणार्‍या हिंदु शेतकर्‍यांना तेवढा आधार द्या.

२. कुणीतरी एक शरजील उस्मानी नावाचे कारटे महाराष्ट्रात येऊन बरळले आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही. ‘एल्गार’ नावाची एक टोळधाड पुणे येथे जमा केली जाते. त्या व्यासपिठावरून केवळ भडकवाभडकवीच केली जाते.

३. नाव एल्गार; पण वाजवायच्या हिंदुत्वविरोधी पिपाण्या. शरजील हिंदुत्वावर शिंतोडे उडवून गेला. त्यास पुणे येथे आमंत्रित करणार्‍यांवर सर्वप्रथम कठोर कारवाई केली पाहिजे. ‘एल्गार परिषदे’च्या निमित्ताने शरजीलसारख्या कमअस्सल अवलादीचे लोक पुण्यात बोलवायचे आणि वातावरण बिघडवायचे, हीच त्यांची दुकानदारी आहे !

४. प्रश्‍न हा आहे की, या शरजीलसारख्या हिंदुत्वद्रोही घाणीचा उगम होतो कुठून ? त्याचे धागेदोरे शेवटी योगी राज्यातच जातात. हा शरजीलही आता पळून उत्तरप्रदेशातील अलीगड येथे लपला आहे. महाराष्ट्राचे पोलीस अलीगड येथे जाऊन या शरजील याच्या मुसक्या आवळतीलच; पण हिंदुत्वविरोधी कारवायांचा कारखाना हा उत्तरेत आहे आणि तेथून सिद्ध झालेला माल देशभरात जात असतो.