कोल्हापूर येथे ६ फेब्रुवारी या दिवशी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा वर्धापनदिन सोहळा !

कोल्हापूर येथे ६ फेब्रुवारी या दिवशी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा वर्धापनदिन सोहळा ! – डॉ. विजय जंगम स्वामी, प्रवक्ते, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍यांचा होणार सत्कार !

पुणे, १ फेब्रुवारी (वार्ता.) – अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा ९ वा वर्धापनदिन ६ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे प्रवक्ते डॉ. विजय जंगम स्वामी यांनी पुणे येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला महासंघाचे अध्यक्ष भिवलिंग जंगम, महासचिव अजित स्वामी, कोषाध्यक्ष प्रकाश जंगम, सचिव वैजनाथ स्वामी, महिला आघाडीच्या प्रमुख विद्याताई जंगम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देतांना डॉ. विजय जंगम स्वामी म्हणाले, ‘‘वीरशैव समाजाच्या उत्कर्षासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार या सोहळ्यामध्ये करण्यात येणार आहे. यासह विविध क्षेत्रांत स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या वीरशैव समाजातील १० मान्यवरांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वर्धापनदिनाचे यजमानपद अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या कोल्हापूर शाखेने स्वीकारले आहे.’’

संतांची वंदनीय उपस्थिती

प.पू. डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य गौडगांवकर (खासदार), प.पू. डॉ. नीळकंठ शिवाचार्य धारेश्‍वर, प.पू. डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य मन्मथधामकर, प.पू. श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर, वेदांतचार्य दिगंबर शिवाचार्य वसमतकर, प.पू. डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य वाईकर, नूल मठाचे मठाधिपती प.पू. गुरुसिद्धेश्‍वर शिवाचार्य यांची वंदनीय उपस्थिती या वर्धापनदिनाला लाभणार आहे, अशी माहिती या वेळी  डॉ. विजय जंगम स्वामी यांनी दिली.

जनगणनेचा अर्ज भरतांना स्वत:चा धर्म ‘हिंदु’ नमूद करा !

वीरशैव समाज हा हिंदु धर्माचाच एक भाग आहे. त्यामुळे त्याला हिंदु धर्मापासून वेगळे करता येत नाही. समाजातील काही राजकीय मंडळी वेगळ्या लिंगायत धर्माची मागणी करत आहेत. येत्या जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात स्वत:चा धर्म लिंगायत असे लिहिण्यासाठी समाजाला सांगून मोठी दिशाभूल करत आहेत. वीरशैव समाजाच्या कोणत्याही घटकाने या अफवेला बळी पडून स्वत:च्या हिंदु धर्माला सोडू नये. जनगणनेचा अर्ज भरतांना धर्माच्या रकान्यात ‘हिंदु धर्म’ असेच नमूद करा. हिंदु हा धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरणपद्धती आहे. याकडे समाज बांधवांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे या वेळी डॉ. विजय जंगम स्वामी यांनी म्हटले.