माशेल येथील श्री देवकीकृष्ण देवस्थानचा मालिनी पौर्णिमा उत्सव

माशेल येथील श्री देवकीकृष्ण देवस्थानचा प्रसिद्ध मालिनी पौर्णिमा उत्सव २८ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्त देवस्थानची थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

संकलक : श्री. महेश मणेरीकर, माशेल

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् । देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।

श्री देेवकीकृष्ण

श्री देवकीकृष्णाचा पूर्वेतिहास

या देवतांचा इतिहास पुराणकालीन आहे. गोव्यात पोर्तुगिजांकडून हिंदूंचा धर्मच्छळ चालू झाला. त्या वेळी भूमीतून देवतांचे स्थलांतर कसे झाले, याच्या रोमांचक कथा सर्वश्रुतच आहेत. आपल्या पूर्वजांनी आपापल्या देवता वस्त्रामध्ये लपवून नदी-खोर्‍यांतून, रानावनातून, वाट मिळेल तिथून पलायन केले आणि पोर्तुगीज अंमलाबाहेर असलेल्या सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवल्या.

श्री देवकीकृष्णाचेही (चूडामणी) चोडण या गावातून मये या गावी जे स्थलांतर केले, ते वर्ष १५३० ते १५४० या कालावधीत असावे, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यानंतर ते फोंडा महालातील माशेल या गावी स्थलांतरित करण्यात आले. सध्याच्या देवालयाची वास्तू आणि प्रतिष्ठापना वर्ष १८२७ मध्ये झाली असावी, अशी नोंद आहे.

देवस्थानचे स्वरूप

श्री देवकीकृष्णाचे मंदिर

पूर्वीच्या जुन्या देवालयाचा चेहरामोहराच तिच्या परमभक्तांनी पूर्ण पालटून टाकून त्याला अत्यंत सुरेख रूप दिलेले आज दृष्टीस पडतेे. रस्त्यापासून काहीशा उंचावर मोठ्या दिमाखात उभारलेले हे मंदिर भारदस्त वाटते. या मंदिराच्या आजूबाजूला तिच्या अनुषंगिक देवतांच्या छोट्या घुमट्या बांधलेल्या आहेत. ही अनुषंगिक दैवते म्हणजे श्री रवळनाथ पांडववाडा (पिसो रवळू), श्री रवळनाथ गावणवाडा (शाणो रवळू), श्री कात्यायनी, श्री चोडणेश्‍वर, श्री महादेव, श्री भूमिका, श्री दाडशंकर. इतर सर्व देवालयांहून येथील वेगळी गोष्टी म्हणजे, इथे पाण्याची तळी नाही. मंदिरासमोर भले मोठे पटांगण आहे, तिथे जत्रा भरते.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवकी आणि कृष्ण या दोन मूर्तींची एकच जोडमूर्ती असलेले आणि वात्सल्यप्रेम दर्शवणारे हे देवकीकृष्णाचे गोमंतकातील एकमेव सुप्रसिद्ध मंदिर आहे. उभी देवकी आणि कडेवर बाळकृष्ण, अशी वात्सल्यमूर्ती इतरत्र कुठेही असल्याचे किंवा पाहिल्याचे ऐकिवात नाही.

देवस्थानचे जत्रोत्सव

या जागृत देवतेची प्रतिवार्षिक जत्रा मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्ष त्रयोदशीला भरते. पौष पौर्णिमेच्या जत्रेला मालिनी पौर्णिमा (कोकणी भाषेत माल्नी-पुनव) म्हणतात. गाभार्‍यात भरजरी वस्त्रांनिशी आणि सुवर्णालंकारांनी सजलेली देवकी आणि तिच्या कडेवरचा बाळकृष्ण ही जोडी दृष्ट लागण्यासारखी गोजिरवाणी दिसते. पौणिमेच्या दिवशी मध्यरात्रीनंतर होणारा रथोत्सव विलोभनीय असतो. रथामध्ये बाळकृष्ण एकटाच आसनस्थ होतो. त्याच्यासमवेत देवकी नसते. ही बाळकृष्णाची इवलीशी मूर्ती सोन्याची, रूप्याची वा रत्नजडित नसून चक्क तुलसी-काष्ठापासून बनवलेली अतिशय मोहक आणि गोजिरवाणी मूर्ती आहे.

इथे जत्रोत्सवाच्या व्यतिरिक्त नवरात्रोत्सव, रामनवमी, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी, लक्ष्मीपूजन, कोजागरी, शिमगा आदी उत्सवही पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. प्रसाद, कौल, नवस, ही सर्व कर्मकांडे यथासार केली जातात; पण देवकी-कृष्णाला प्रसाद लावण्याची प्रथा नाही. तो रवळनाथ (गावणवाडा) आणि रवळनाथ (पांडववाडा) या देवतांस लावला जातो. सार्वजनिक प्रसाद श्री भूमिकादेवीला लावतात. प्रसादपाकळीचे येथील वैशिष्ट्य म्हणजे इथे कौल मागण्यासाठी फुलाची पाकळी न वापरता देवाच्या मूर्तीला करमलीच्या पानांचे तुकडे चिकटवले जातात. येथे देवाच्या दर्शनासाठी कधी आलात, तर महाजनांसाठी बांधलेल्या सर्व आवश्यक सुखसोयींनी युक्त अशा विस्तीर्ण खोल्यांच्या प्रेमळ कवेत चिंतामुक्त असा विसावा मिळतो. प्रेमळ नि लाघवी आपुलकीची गोमंतकीय ऊब मिळते. जोडीला संस्थानाच्या अन्नपूर्णाची शुद्ध शाकाहारी सुग्रास जेवणाची चव चाखायला मिळते. ही अन्नपूर्णा सर्व भाविकांना सकाळचा चहा, न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण देऊन नक्कीच तृप्त करते.

श्री देवकीकृष्ण संस्थानचे सक्रीय व्यवस्थापन

संस्थानाचे व्यवस्थापन महाजनांनी निवडून दिलेल्या व्यवस्थापक समितीच्या द्वारे होते. ही समिती देवालयांचे व्यवस्थापन, डागडुजी, देवस्थानातील पूजा-अर्चा विधींविषयी देखरेख, देवस्थानांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची निगा राखणे, तसेच देवस्थानच्या आत आणि प्राकारात योग्य ते पालट अन् सुधार इत्यादी कामांची देखरेख करते. मंदिरातील दैनंदिन कारभार व्यवस्थित व्हावा आणि महाजनांकडे सतत संपर्क रहावा, यासाठी एका व्यवस्थापकाची नेमणूक करण्यात आली आहे. देवालयाची स्वच्छता राखण्याविषयीही व्यवस्थापनाचा कटाक्ष असतो. मंदिरात प्रतिदिन अभिषेक, कुंकुमार्चन, श्रींची नित्यपूजा, महाआरती असल्यास रंगपूजा इत्यादी विधी होतात. सामायिक खोली, अगरशाळा, भोजनालय इत्यादी सुविधा येथे उपलब्ध आहेत. तसेच अन्नदान सेवा, अन्नदाता योजना, कौलप्रसाद, त्रयोदशी, शिबिकोत्सव इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

कार्यक्रम

या देवस्थानचा वार्षिक मालिनी पौर्णिमेचा जत्रोत्सव यंदा २८ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे.

कोविड-१९ च्या महामारीमुळे यंदाचा जत्रोत्सव संस्थानचे पुजारी, भगत, कार्यकारी समिती आणि कर्मचारीवर्ग यांच्या वतीने मर्यादित प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.

जत्रोत्सवानिमित्त होणारे महाजनांची स्वतः अभिषेक सेवा, सुवासिनींच्या ओट्या, दिवजा, उफार, महाप्रसाद, वार्षिक नारळ-पड आणि पहाटेचा रथोत्सव आदी धार्मिक कार्यक्रम यंदा वगळण्यात आले आहेत. याची महाजन बंधूभगिनींनी आणि इतर भक्त अन् भाविकांनी नोंद घेऊन संस्थानच्या कार्यकारी समितीस पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती श्री संस्थान कार्यकारी मंडळाने केली आहे.