अनंत काळापासून मानव आपले संकट दूर करण्यासाठी ईश्वराकडे धावत येत असतो. त्याच्या चरणांशी तो नतमस्तक होतो. आपल्यातील भाव अधिक वृद्धींगत व्हावा, म्हणून तो त्याची सेवा करतो आणि ईश्वराचा परमभक्तही बनतो. म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर हे तर भक्तवत्सल अन् सत्वर हाकेला धावणारे जागृत दैवत. २७ जानेवारीला या देवतेचा ६वा जत्रोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने या देवतेविषयी थोडक्यात माहिती देत आहोत.
ग्रामदेवी श्री शांतादुर्गादेवीकडून गावाच्या रक्षणाचा आदेश
श्री देव बोडगेश्वर म्हापशाची ग्रामदेवी श्री शांतादुर्गादेवीच्या आदेशाचा एक पाईक आहे. म्हापसा येथील रहिवाशांचे तसेच इतर जनांचे कल्याण करावे, असा त्याला देवीचा आदेश आहे. हा आदेश श्री देव बोडगेश्वर प्रामाणिकपणे पार पाडतो. यामुळे त्याचे माहात्म्य वाढले आहे.
श्री बोडगेश्वरदेवाचा पोशाख
काही वर्षांपूर्वी खोर्ली, म्हापसा येथील कासारवाड्यावरील चित्रकार अंबाजी शिंदे यांच्या मातोश्रींना झोप लागत नसली की, त्या घराच्या गच्चीवर बसायच्या. अनेक वेळा त्यांना रात्रीच्या ठराविक वेळी दंडुक्याचा खळ्ळ, खळ्ळ .. असा आवाज ऐकू यायचा. त्या आवाजाकडे त्यांनी लक्षपूर्वक पहायला प्रारंभ केला. त्यांना अस्पष्ट अशी बोडगेश्वराची आकृती दिसली. कमरेला सफेद धोतर, खांद्यावर कांबळ आणि उजव्या हातात ‘खळ्ळ, असा आवाज करणारा दंडुका, तर डाव्या हातात पेटलेली धगधगती मशाल, डोक्याला फेटा, कपाळाला सफेद टिळा, पायात कोल्हापुरी चप्पल, चेहरा अगदी धीर गंभीर, पीळदार मिशा असलेला ! तिने आपल्या मुलाला याची कल्पना दिली. श्री. शिंदे यांनी लगेच त्याच्या कुंचल्याने श्री देव बोडगेश्वराचे चित्र मातोश्रींनी वर्णन केल्याप्रमाणे रेखाटले. या चित्राची कालांतराने छायाचित्रे तयार करण्यात आली. त्यावरून विद्यमान पाषाणमूर्ती बनवण्यात आली आहे.
वाटसरूला मशालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारा देव
पोर्तुगीज काळात जनरेटरवर सिद्ध झालेली वीज ठराविक भागापर्यंत पोचायची. आता सर्वत्र आधुनिकीकरण झाल्यामुळे सर्वत्र वीजजोडण्या आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी लख्ख प्रकाश आहे. त्या काळात विजेचा अल्प प्रकाश आणि सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असे ! रात्री १० नंतर श्री देव बोडगेश्वर मंदिराकडे येतांना त्याच्या हातात पेटती मशाल अनेकांनी पाहिली आहे. देवस्थानचे पुजारी श्री. श्याम यांचा तर या मशालीबाबत दांडगा अनुभव आहे. प्रकाशाने दीपून जावे, असा प्रखर प्रकाश या मशालीतून बाहेर पडतो. शहराच्या रक्षणासाठी श्री देव बोडगेश्वर रात्रभर हिंडत असतो. एखाद्या वाटसरूला आपलेपणाने मार्गदर्शन करतो, अशा अनेक आख्यायिका आहेत.
जत्रोत्सवासाठी त्या काळी अनेक लोक पायी चालत यायचे. काळोख असल्याने वाड्यावाड्यावरील लोक गटागटाने यायचे. या गटातील एखादी व्यक्ती मागे एकटी राहिली, तर या व्यक्तीला त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे दायित्व श्री देव बोडगेश्वर घेतो. घरी पोचल्यावर त्या व्यक्तीच्या घरच्या लोकांनी दार उघडले की, श्री देव बोडगेश्वर आपल्या दांड्याचा खळ्ळ, खळ्ळ,.. असा आवाज करत असे. त्यामुळे घरच्यांना श्री देव बोडगेश्वराने घरी पोचवल्याचे लक्षात येई.
नवसाला पावणारा श्री बोडगेश्वरदेव
प्रत्येक रविवारी आणि बुधवारी अनेक भक्तगण श्री देव बोडगेश्वराच्या मंदिरात येतात. आपल्या समस्या गार्हाण्याद्वारे देवाकडे मांडतात आणि काम व्हावे, म्हणून देवाला नवस बोलतात. या समस्या मांडल्यानंतर कामे पटकन झाल्याच्या अनुभूती अनेक भक्तांनी घेतल्या आहेत. गार्हाण्याद्वारे समस्या मांडून नवस बोलल्यामुळे भक्तगण तितक्याच तत्परतेने पुढच्या रविवारी किंवा बुधवारी नवस फेडण्यासाठी येतात. देवाच्या कृपाछत्राची ही शक्ती आता म्हापसा शहरापुरती मर्यादित न रहाता गोवाभर पोचली आहे. त्यामुळे संपूर्ण गोव्यातील सहस्रावधी लोक जत्रेला येतात. लहानांपासून थोरांपर्यंत, सर्व धर्मियांना संकट समयी पावून त्यांचे संकट दूर करणारा, सत्वर धावून येणारा देव, अशी श्री बोडगेश्वराची ख्याती असल्याने त्याच्या जत्रोत्सवाला आनंदाचे उधाण आणि भक्तांचा महासागर लोटलेला असतो.
संकलक : श्री. राजेश कोरगावकर, म्हापसा
श्री देव बोडगेश्वर : म्हापशाचा राखणदार
कित्येक वर्षांपूर्वी खोर्ली, म्हापसा येथील एक व्यक्ती (कै.) भिकू बाबू केरकर विद्यमान देवस्थानच्या ठिकाणी प्रतिदिन यायचे. एका स्त्रीवर अवसर आल्यानंतर तिने सांगितल्यानुसार भिकू केरकर यांनी प्रतिदिन देवस्थानच्या ठिकाणी येऊन देवाची भक्ती करण्यास प्रारंभ केला. अखेर त्यांना एक दृष्टांत झाला त्याप्रमाणे ते प्रतिदिन सायंकाळी खोर्ली येथील टेकडीवर श्री बोडगेश्वरदेवाचा भाऊ श्री घाटेश्वराला दिवा लावू लागले. श्री घाटेश्वराला दिवा लावल्यानंतर भिकू केरकर पुन्हा २ कि.मी. अंतरावरील बोडगिणी या देवस्थानच्या ठिकाणी येऊन तेथे वडाच्या झाडाखाली प्रतिदिन दिवा लावत असत. बोंडगीच्या वनातील श्री देव बोडगेश्वर हळूहळू संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध होऊ लागला. नंतर त्या ठिकाणी पेड बांधण्यात आले आणि त्यामुळे जागेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. काही वर्षांपूर्वी या देवस्थानच्या परिसरात श्री कणकेश्वर आणि श्री खाप्रेश्वर या उपदेवतांच्या घुमटी बांधण्यात आल्या.