पणजी, २२ जानेवारी (वार्ता.) – कोरोनाची लस घेतल्यानंतर पुढील २४ घंट्यांच्या आत वेदना होणे, अंगदुखी, शारीरिक थकवा जाणवणे, ताप येणे, उलटी येणे, पडशाचा त्रास होणे, पोटदुखी आदी त्रास होणे ही दिसून येणारी सर्वसामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसणे म्हणजे ‘लस घेणार्याच्या रोगप्रतिकारशक्तीच्या दृष्टीने लस कार्य करू लागली आहे’, असे समजावे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या संचालकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, गोव्यात देण्यात आलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीच्या ४२६ लाभार्थ्यांनाही अशाच स्वरूपाची एक किंवा अधिक लक्षणे दिसत होती. ‘पॅरासिटामोल’ ही गोळी, ‘ओ.आर्.एस्.’ आणि अन्य साध्या उपचारांनी या लक्षणांवर मात करता येते. या लसीला ‘आय.सी.एम्.आर्.’ आणि ‘ड्रग कन्ट्रोलर ऑफ इंडिया’ यांनी मान्यता दिलेली आहे.