दिग्दर्शक अली अब्बास जफर याने एका आठवड्यात चौकशीसाठी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे यावे !

  • ‘तांडव’ वेब सिरीजमध्ये हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याचे प्रकरण !

  • उत्तरप्रदेश पोलिसांनी अली जफर याच्या घरावर चिकटवली नोटीस !

‘तांडव’च्या विरोधात मुंबईत तक्रार प्रविष्ट होऊनही मुंबई पोलिसांनी आरोपींना लगेच अटक का केली नाही ? याउलट उत्तरप्रदेशमधील लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे ‘तांडव’च्या विरोधात गुन्हा नोंद झाल्यानंतर तेथील पोलीस आरोपींना अटक करण्यासाठी लगेच मुंबईत येतात, हे मुंबई पोलिसांना लज्जास्पद आहे !

मुंबई – हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी अभिनेता सैफ अली खान याची मुख्य भूमिका असलेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजच्या विरोधात लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे काही दिवसांपूर्वीच गुन्हा नोंद झाला आहे. ‘तांडव’ वेब सिरीजचा दिग्दर्शक अली अब्बास जफर याच्यासह लखनौ येथील हजरतगंज येथे नोंद करण्यात आलेल्या फिर्यादीमधील सर्व आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे हे विशेष पथक मुंबईत आले आहे. हे पथक २१ जानेवारी या दिवशी अली जफर याच्या घरी गेले, तेव्हा तेथे त्याची भेट झाली नाही. अन्वेषण अधिकारी अनिल कुमार सिंग यांनी त्याच्या घराबाहेर नोटीस चिकटवली असून त्यामध्ये अली यास २७ जानेवारी या दिवशी लखनौ येथेे चौकशीसाठी उपस्थित रहाण्यास सांगितले आहे.

अली याच्या घराला कुलूप होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरी नोटीस चिकटवली. मुंबई उच्च न्यायालयाने दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशू मेहरा, लेखक गौरव सोलंकी आणि ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’च्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांना २० जानेवारी या दिवशी अटकपूर्व जामीन संमत केला आहे. त्यामुळे या आरोपींना पुढील ३ आठवड्यांसाठी दिलासा मिळाला आहे.

याप्रकरणी मुंबईतही तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर निर्मात्यांनी क्षमा मागितली असून मालिकेतील वादग्रस्त दृश्ये हटवण्यात आली असल्याचे सांगितले आहे. आमदार राम कदम यांच्या मागणीवरून मुंबई पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम १५३ (अ), २९५ (अ) आणि ५०५ (२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. ‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात पोलिसांत नोंद झालेले हे मुंबई येथील पहिले प्रकरण आहे. यापूर्वी सदर वेब सिरीजच्या विरोधात उत्तरप्रदेशमधील लक्ष्मणपुरी आणि नोएडा, झारखंडमधील रांची, तसेच मध्यप्रदेशमधील जबलपूर येथेही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.