मुंबई – येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी देहलीत ‘इंडिया गेट’जवळील राजपथावर होणार्या पथसंचलनात महाराष्ट्रातील संत परंपरा दर्शवणारा चित्ररथ सहभागी होणार असून याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
या चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ८ फुटांची आसनस्थ मूर्ती आहे. त्यांच्या मूर्तीसमोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शवण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शवणारे प्रत्येकी ८ फूट उंचीचे २ पुतळे उभारण्यात आले आहेत. या पाठोपाठ राज्यातील संतांचे आणि कोट्यवधी भक्तांचे दैवत असणार्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी ८.५ फूट उंचीची मूर्ती उभारण्यात आली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात ८ फूट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे. यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता माळी, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत चोखामेळा आदींच्या प्रतिकृती बनवण्यात आल्या आहेत. या सर्व पुतळ्यांची बांधणी पूर्ण झाली असून त्यावर रंगकाम चालू आहे.