रुग्णालयातील उपकरणांच्या देखभालीकडे चेन्नई येथील आस्थापनाचे दुर्लक्ष !

भंडारा रुग्णालयातील आगीचे प्रकरण

भंडारा – राज्यातील सर्व जिल्हा सामान्य रुग्णालयांतील उपकरणे हाताळणे आणि त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्य शासनाने ३ वर्षांपूर्वी चेन्नईस्थित ‘फेबर सिंदुरी’ या आस्थापनाला कंत्राट दिले आहे. या आस्थापनाच्या माध्यमातून सामान्य रुग्णालयात एक अभियंता नियुक्त करून त्याच्या माध्यमातून सर्व उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करणे आवश्यक आहे; मात्र या आस्थापन आणि अभियंत्याने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळेच भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात १० नवजात निष्पाप बालकांना जीव गमवावा लागल्याची गोष्ट समोर आली आहे. या संदर्भात आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

(या प्रकरणात ‘फेबर सिंदुरी’ या आस्थापनाचा दोष असेल, तर आस्थापनाच्या संबंधित मालकांवर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली पाहिजे, तसेच रुग्णालयाची सर्व हानीभरपाई वसूल केली पाहिजे. पोलिसांनी जलदगतीने या प्रकरणाचे अन्वेषण करणे आवश्यक आहे. – संपादक)