सोयीसुविधांच्या अभावी खैरी (जिल्हा वर्धा) येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

ग्रामस्थांना इतकी वर्षे सोयीसुविधा का मिळाल्या नाहीत ? याचा शासन-प्रशासन यांनी विचार करावा !

वर्धा – कारंजा तालुक्यातील जऊरवाडा गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर खैरी या पुनर्वसित गावाने बहिष्कार घातला, तसेच ग्रामस्थांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी चूलबंद आणि अन्नत्याग आंदोलन चालू केले. गावाचे पुनर्वसन होऊन ग्रामपंचायत स्थापन झाली; मात्र तरीही गावातील सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांच्या बहिष्कारामुळे मतदान केंद्रावर केवळ मतदान अधिकारी आणि पोलीस होते.

२० वर्षे होऊनही गावात नागरी सुविधा पोचलेल्या नाहीत. गट ग्रामपंचायतीच्या ऐवजी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करावी, गावात पायाभूत सुविधांचा विकास करावा, अशा विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. जोपर्यंत गावाचा विकास होणार नाही, तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घातल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.