भारतीय संस्कृतीचे मूर्तीमंत रूप म्हणजे स्वामी विवेकानंद ! – प्रा. अरुण मर्गज

कुडाळ – भारतीय संस्कृतीचे सच्चे प्रतिनिधी म्हणजे स्वामी विवेकानंद होते. युवकांमधील तेजस्वी सामर्थ्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होय आणि मुलांना संस्कारित करून त्यांच्यामध्ये स्वराज्य स्थापनेची दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करणार्‍या समर्थ माता जिजाऊ या भारतवर्षाला मिळालेली मौलिक देणगी आहेत. असे प्रतिपादन प्रा. अरुण मर्गज यांनी कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षणसंस्थेमध्ये विविध विभागांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन, म्हणजे स्वामी विवेकानंद  यांची जयंती आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती यांनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

प्रा. अरुण मर्गज पुढे म्हणाले, ‘‘विवेकानंदांचा भारतीय अध्यात्मावर श्रद्धा असलेला विश्‍वबंधुत्वाची शिकवण देणारा मानवतावाद, त्याचे वैश्‍विक सत्य, धर्माची ओळख करून देणारे तत्त्वज्ञान आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण देणारे, ते खरे शिक्षण ! याविषयीची स्वामी विवेकानंदांची विचारधारा पुष्कळ मोलाची आहे.’’ प्रा. अरुण मर्गज यांनी पुढे राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्यनिर्मितीमधील जिजाऊचे योगदान, छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यासंदर्भातील त्यांची भूमिका यांविषयी उपस्थितांना माहिती दिली. आई समर्थ असेल, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यांची शिकवण देणारी असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कसा निर्माण होऊ शकतो, याचे अनेक उदाहरणांतून त्यांनी विवेचन केले. ‘त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात केले, त्यांचे आदर्शवत् विचार घेऊन भावी पिढी आपण घडवली, तर ती खर्‍या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल’, असे त्यांनी सांगितले.

या वेळी जिजाऊमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी त्यांना मानवंदना आणि आदरांजली अर्पण केली.