भाजपचे उपमहापौर राजेश काळे पक्षातून बडतर्फ

महापालिका अधिकार्‍यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचे प्रकरण

भाजपचे उपमहापौर राजेश काळे

सोलापूर – उपमहापौर राजेश काळे यांना भाजप पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राजेश काळे यांच्यावर महापालिका आयुक्त आणि उपायुक्त यांना खंडणीसाठी धमकावणे, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, असे आरोप उपायुक्त धनराज पांडे यांनी दिलेल्या तक्रारीत करण्यात आले होेते. यानंतर पोलिसांनी राजेश काळे यांना अटक केली होती, तसेच त्यांना २ दिवस पोलीस कोठडीही देण्यात आली होती.

काळे यांच्याविषयी अनेक सत्ताधारी नगरसेवकांनी शहराध्यक्षांकडे तक्रारी केल्या होत्या, तसेच यापूर्वीही काळे यांच्यावर अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी उपमहापौर राजेश काळे यांच्या संबंधात आलेल्या तक्रारींचा, तसेच नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा अहवाल प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला होता. राजेश काळे यांच्यामुळे पक्षहितास बाधा पोचत आहे, असा ठपका ठेवून त्यांना पक्षातून काढून टाकत असल्याची माहिती स्थानिक पातळीवर पदाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आली होती. या आधारावर स्थानिक पदाधिकार्‍यांनी उपमहापौर राजेश काळे यांना पक्षातून बडतर्फ केल्याचे स्पष्ट केले आहे.