प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित केल्याचे शासनाने लेखी आश्‍वासन द्यावे ! – मेळावली ग्रामस्थ

प्रतीकात्मक छायाचित्र

वाळपई, १३ जानेवारी (वार्ता.) – शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित केल्याचे शासनाने लेखी आश्‍वासन द्यावे. ग्रामस्थांना शासनाचे तोंडी आश्‍वासन नको, तसेच शासनाने ग्रामस्थांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या सर्व तक्रारी मागे घ्याव्यात, अशी मागणी शेळ-मेळावली ग्रामस्थांनी केली आहे. स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी १२ जानेवारी या दिवशी अचानकपणे मेळावली येथील आयआयटी प्रकल्प रहित करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लिहून ते पत्र सामाजिक माध्यमात प्रसारित केले होते. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या या पालट झालेल्या भूमिकेला अनुसरून ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे.

मेळावली येथील ग्रामस्थ म्हणाले,‘‘प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात मेळावली ग्रामस्थांना आता संपूर्ण सत्तरी तालुक्याचा पाठिंबा लाभत असल्याने स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे धास्तावले आहेत. त्यांना ‘सत्तरी येथील त्यांची मतपेढी नष्ट होणार’, अशी भीती वाटू लागली आहे.’’

आरोग्यमंत्री राणे यांच्या प्रस्तावावर विचार करण्यास वेळ पाहिजे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘मी सध्या केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावरील वैद्यकीय सुविधेच्या व्यवस्थापनामध्ये व्यस्त असल्याने आरोग्यमंत्र्यांच्या आयआयटी प्रकल्प रहित करण्याविषयीच्या प्रस्तावावर विचार करायला वेळ मिळाला नाही. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावरील वैद्यकीय सुविधेचे व्यवस्थापन करण्यास प्राधान्य दिले आहे. याविषयी विचार करण्यास थोडा वेळ द्यावा.’’