साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
‘आगामी आपत्काळात अन्न-धान्य, पाणी आणि वीज या जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून साधक सौरऊर्जा यंत्रणा बसवून घेत आहेत. ‘सौरऊर्जेद्वारे मिळणार्या विजेचा वापर योग्य प्रकारे व्हावा’, यासाठी पुढील सूत्र लक्षात घ्यावे.
पूर्वी वापरात असलेल्या साध्या दिव्यापासून ते सर्वच प्रकारच्या विद्युत् उपकरणांच्या निर्मितीमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे आणि अजूनही होत आहे, उदा. पूर्वीच्या लालसर उजेड देणार्या दिव्यांच्या जागी पांढर्या रंगाचा उजेड देणारे ‘सीएफ्एल्’चे (CFLचे) दिवे आले आहेत. त्यानंतर आता नवीन ‘एल्ईडी’चे (LED चे) दिवे आले. हे दिवे पूर्वीच्या दिव्यांच्या तुलनेत अत्यल्प वीज वापरतात.
याप्रमाणेच पंखे, शीतकपाट, ‘कूलर’ (थंडावा निर्माण करणारे यंत्र), धुलाईयंत्र, वातानुकूलन यंत्र इत्यादी विविध यंत्रे बनवणारी आस्थापने त्यांत सातत्याने सुधारणा करून विजेचा अल्प वापर करणारी यंत्रे वा उपकरणे बनवण्यावर भर देत आहेत.
हे सूत्र लक्षात घेऊन नवीन उपकरणे खरेदी करतांना विजेचा अल्प वापर करणारी उपकरणे खरेदी करण्यावर भर द्यावा. आर्थिकदृष्ट्या शक्य असल्यास जुनी झालेली उपकरणे पालटून नवीन उपकरणे घेऊ शकतो. त्यामुळे सौरऊर्जेद्वारे मिळणार्या विजेचा वापर अल्प प्रमाणात झाल्याने आपत्कालीन स्थितीतही विद्युत् उपकरणांचा वापर सुरळीत चालू राहील.’