आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप’ मध्ये १२ चित्रपट प्रदर्शित होणार

पणजी, १२ जानेवारी (वार्ता.) – गोव्यात होणार्‍या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप’ मध्ये १२ चित्रपट प्रदर्शित करण्यात येतील, असे आयोजकांनी सांगितले. या चित्रपटांमध्ये फिलिप लॅकोटे यांचा ‘नाईट ऑफ द किंग्स्’, इमेन्युअल मोरेट्स यांचा ‘लव्ह अफेअर्स’ आणि इमेन्युअल कोरकोल यांचा ‘द बिग हिट’ हे फ्रान्समधील चित्रपट दाखवण्यात येतील.  जगभरातील चित्रपटांमधून उत्कृष्ट आणि निवडक असे चित्रपट ‘कॅलिडोस्कोप’ या विभागात दाखवण्यात येतात.

गोवा विभागात ‘शिंवर’ आणि ‘रिटन इन द कॉर्नर्स’ या चित्रपटांची निवड

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा गोवा विभागातून ‘शिंवर’ आणि ‘रिटन इन द कॉर्नर्स’ या चित्रपटांची निवड झाली आहे. ‘शिंवर’ चित्रपटाची प्रिमिअर गटात, तर ‘रिटन इन द कॉर्नर्सं’ चित्रपटाची नॉन प्रिमिअर गटात निवड झाली आहे. गोव्यातील चित्रपट उद्योगाने गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय स्तरावर स्वतःची छाप पाडली आहे. यंदा ५१ व्या चित्रपट महोत्सवात प्रिमिअर गटासाठी गोव्यातून ५ प्रवेशिका, तर नॉन प्रिमिअर गटासाठी २ प्रवेशिका आल्या होत्या. ज्युरी सदस्य म्हणून चित्रपट उद्योगातील संजय कपूर, रजत नागपाल आणि रिधम् जान्वे हे होते.