आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाका आंदोलनाच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह १७ जण निर्दोष मुक्त

सातारा, ११ जानेवारी (वार्ता.) – आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाक्यावर नियमबाह्य पथकर वसुली विरोधात केलेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह १७ जणांची सबळ पुराव्याअभावी वाई न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झालेली असतांना आणि प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नसतांना पथकर नाक्यावर पथकर वसुली होत होती. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या विरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांंचे समर्थक यांनी १८ डिसेंबर २०१९ या दिवशी पथकर नाक्यावर आंदोलन केले होते. तेव्हा आ. भोसले आणि त्यांचे ८० समर्थक यांनी पथकर वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच घोषणा देऊन निदर्शने केली होती.

या वेळी जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचेही आंदोलकांकडून उल्लंघन झाले होते. यामुळे भुईंज पोलिसांनी आमदार भोसले आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा नोंद केला होता. वाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एन्. गिरवलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये आमदार भोसले आणि त्यांचे १७ समर्थक यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.