महिला या ऊर्जेचा स्रोत असल्याने त्यांना कोणीही न्यून लेखू नये ! – माजी केंद्रीय मंत्री उमा भारती

पुणे – कोरोना काळात महिला डॉक्टर आणि परिचारिका यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. महिला या ऊर्जेचा स्रोत आहेत. त्यांना कोणीही न्यून लेखू नये. देशातील कोणत्याही महिलेला पुरुषासमोर पैशांसाठी हात पसरावा लागणार नाही, अशी आर्थिक स्थिती निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी ११ जानेवारी या दिवशी व्यक्त केले. एम्.आय.टी. विश्‍वशांती विद्यापिठाच्या ‘स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’च्या वतीने ‘ऑनलाईन’ पद्धतीने आयोजित केलेल्या चार दिवसांच्या दुसर्‍या राष्ट्रीय महिला संसदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, ‘एम्.आय.टी.’चे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, कुलगुरु प्रा. डॉ. एन्.टी. राव आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.