भारतीय प्राचीन पद्धतीकडे आता समाज वळू लागला आहे; मात्र गायीचे शेण मिळण्यासाठी प्रथम गायी जिवंत रहाणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकार काय करणार आहे ?, हे गडकरी यांनी जनतेला सांगायला हवे, असे हिंदूंना वाटते !
नवी देहली – देशातील अनेक गावांतील घरे आजही गायीच्या शेणाने सारवली जातात. भूमीही सारवली जाते. आता याच शेणाचा वापर करून रंगकाम करण्यासाठी रंग बनवण्यात येत आहेत. खादी आणि ग्रामउद्योग आयोगाकडून बनवण्यात आलेल्या ‘वेदिक पेंट’ या रंगांचे उद्या, १२ जानेवारी यादिवशी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या वेदिक रंगांमुळे शेतकर्यांना वार्षिक ५५ सहस्र रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. वेदिक रंग ‘डिस्टेंपर’ आणि ‘इमल्शन’ अशा २ प्रकारांत उपलब्ध होणार आहे. हे रंग पर्यावरणपूरक, नॉन टॉक्सिक, विषाणूविरोधी, अॅन्टी फंगल आणि वॉशेबल आहेत. रंगरंगोटी झाल्यावर केवळ ४ घंट्यांत हा रंग वाळतो.