खेड येथील होळकरांच्या वास्तूला संवर्धित स्मारकाचा दर्जा द्यावा – विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर

किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी

होळकर किल्ला

पुणे – मल्हारराव होळकरांनी बांधलेली आणि सध्या रयत शिक्षण संस्थेच्या कह्यात असलेली खेड तालुक्यातील वाफगाव येथील वास्तूची दूरवस्था झाली आहे. तिच्या संवर्धनासाठी ती रयत शिक्षण संस्थेकडून कह्यात घ्यावी आणि होळकर कुटुंबियांकडे देत तिचे जतन करावे. या वास्तूला संवर्धित स्मारकाचा दर्जा द्यावा, तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सवाई यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ६ जानेवारी या दिवशी आयोजित कार्यक्रमात पडळकर बोलत होते.

सुभेदार होळकर यांनी हा किल्ला उभारला. स्वातंत्र्याच्या वेळी शैक्षणिक विनियोगासाठी होळकर यांनी हा किल्ला रयत शिक्षण संस्थेला दिला. इतर गड किल्ल्याप्रमाणे या वास्तूचे जतन करणे आवश्यक असून रायगडाच्या धर्तीवर येथेही समिती स्थापन व्हावी, असे होळकरांचे वंशज भूषणराजे होळकर यांनी सांगितले.