सांगलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान शाळेच्या भूखंडावरील आरक्षण उठवण्याचा प्रस्ताव महासभेत फेटाळणार ! – युवराज बावडेकर, गटनेता, भाजप
सांगली, ८ जानेवारी (वार्ता.) – विश्रामबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान शाळेच्या आरक्षित भूखंडाविषयी भाजपची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे. या भूखंडावर शाळा आणि क्रीडांगण यांचे आरक्षण आहे. ते उठवण्यास प्रस्ताव महासभेसमोर आल्यास तो चर्चा करून फेटाळला जाईल, अशी माहिती भाजपचे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील भाजप गटनेते श्री. युवराज बावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. बावडेकर पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या शाळेजवळील भूखंडावरील आरक्षण उठवण्यास भाजपचा विरोधच आहे. महासभेसमोर हा विषय आल्यास यावर सखोल चर्चा होऊन तो फेटाळण्यात येईल. यापूर्वीही भाजपच्या कार्यकाळात असे अनेक प्रस्ताव फेटाळले आहेत. पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार हाच भाजपचा ‘अजेंडा’ असल्याने आरक्षण उठवण्याच्या प्रकरणात भाजपमधील कोणाचाही हात नाही.’’
सांगली शहरातील महापालिका क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ३६३/२ या ६ सहस्र ६०० चौरस मीटर भूमीवरील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे आरक्षण हटवून या भूमीचा रहिवासी क्षेत्रात समावेश करण्याविषयी शासनाने निर्णय दिला आहे. महापालिका आयुक्तांनी अधिसूचना काढून या विषयात सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. याला स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने तीव्र विरोध करत याविषयी मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, पालकमंत्री, तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.