२५ जानेवारीपासून मंत्रालय आपल्या दारी या मोहिमेचा कोल्हापूर येथून प्रारंभ

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई – राज्यातील सर्वच विभागीय सहसंचालक कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अभियानाचा आरंभ २५ जानेवारी या दिवशी कोल्हापूर येथून करण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता यांना दिले. येथील उच्च शिक्षण विभागांतर्गत विभागीय सहसंचालक कार्यालयांमध्ये चालू असलेल्या कामकाजाची गंभीर नोंद घेत झालेल्या आढावा बैठकीत ३ मासांचा कालबद्ध कार्यक्रम करण्याच्या सूचना विभागाचे सचिव गुप्ता यांना दिले आहेत. या वेळी शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, उपसचिव कहार, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, डॉ. अशोक उबाळे, प्राचार्य अर्जुन आबिटकर आदी उपस्थित होते.

सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत बैठक आयोजित केली जाणार आहे. प्रथम सत्रात महाविद्यालयीन आणि विद्यापिठाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे विविध प्रश्‍न आणि दुपारच्या सत्रात संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासाठी वेळ राखीव ठेवून प्रश्‍न निकाली काढण्यात येणार आहे. बैठकीचे नियोजन शिवाजी विद्यापिठात करण्यात येणार आहे.