तासगाव येथील नगर वाचन मंदिर चालू करून तेथील अपप्रकार थांबवा ! – शिवसेना तालुका संघटक सचिन चव्हाण यांचे तहसीलदारांना निवेदन

तासगाव (जिल्हा सांगली) – वर्ष १९४७ मध्ये स्थापन झालेल्या येथील नगर वाचन मंदिर तासगाव हे शासनमान्य वाचनालय असून ते तालुका ब वर्ग गटात मोडते. हे वाचनालय गेली ३ वर्षे काही लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत राजकारणामुळे बंद असून नगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आपले स्वतःचे कार्यालय चालू केले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेथे मटका चालू असतो. तरी तासगाव येथील नगर वाचन मंदिर चालू करून तेथील अपप्रकार थांबवावेत, या मागणीचे निवेदन शिवसेना तालुका संघटक श्री. सचिन चव्हाण यांनी तहसीलदारांना दिले आहे. (वाचनालय ३ वर्षे बंद असणे, तेथे लोकप्रतिनिधींचे कार्यालय आणि मटका चालू असणे हे त्याहून अधिक गंभीर आहे ! तरी संबंधित अधिकार्‍यांनी यात त्वरित लक्ष घालून कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

तहसीलदारांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही कर्मचार्‍यांचे वेतन ३ वर्षे दिले गेलेले नाही. तरी ज्या कर्मचार्‍यांचे वेतन प्रलंबित आहे, ते त्यांना त्वरित देण्यात यावे. ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे भांडार. हे ज्ञानाचे भांडार बंद करून तेथे अपप्रकार चालू देणे, हा प्रकार दुर्दैवी असून हे अपप्रकार न थांबल्यास शिवसेना पद्धतीने हे आंदोलन केले जाईल.