नेवरा येथील श्री महालक्ष्मी संस्थानचा २१ वा नूतनमूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन !

नेवरा येथील श्री महालक्ष्मी संस्थानचा नूतनमूर्ती प्रतिष्ठापनेचा २१ वा वर्धापनदिन ७, ८ आणि ९ जानेवारी २०२१, असा ३ दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक विधी होणार आहेत.

नेवरा येथील आदिशक्ती श्री महालक्ष्मीदेवीच्या नियोजित मंदिराची पायाभरणी हातुर्ली मठाधीश गोमंतक विभूषण प.पू. ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते झाली होती. नूतनमूर्ती प्रतिष्ठापनाही त्यांच्याच हस्ते पार पडली.

श्री महालक्ष्मीदेवी

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

मंदिराची रचना

मंदिरामध्ये जातांना उजवीकडे दीपस्तंभ आहे. मंदिराला सभामंडप असून त्यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहात उच्चासनावर श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती बसवण्यात आली आहे. देवीच्या उजव्या बाजूला यज्ञमंडप आहे. डाव्या बाजूला लहान मंदिर आहे. मध्यभागी ३००-४०० भाविकांना बसण्यायोग्य सभामंडप आहे. बाजूला तुळशीवृंदावन आहे.

श्री महालक्ष्मीदेवीच्या उजव्या बाजूच्या एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात कमळ आहे. डाव्या बाजूच्या एका हातात ढाल आणि दुसर्‍या हातात शंख आहे.

श्री महालक्ष्मी देवस्थान जागृत देवस्थान आहे. लोकांची देवीवर पूर्ण श्रद्धा आहे. वर्षातून एकदा येणारा देवीचा प्रतिष्ठापना उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देवीची गावातून बँडसह वाजत-गाजत दिंडी पथकासह मिरवणूक काढण्यात येते. गावातील सुवासिनी त्यांच्या घराच्या दारात देवी आल्यानंतर ओटी भरतात. मुख्य म्हणजे लग्न करून दुसर्‍या गावात दिलेल्या या गावातल्या मुली आवर्जून या उत्सवाला उपस्थित रहातात आणि देवीची ओटी भरतात.

कार्यक्रम

प्रतिवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष कृष्ण पक्ष नवमी; म्हणजे ७ जानेवारी २०२१ या दिवशी सकाळी धार्मिक विधी, श्रीसुक्त अभिषेक, नवचंडी, कुकुंमतिलक, महापूजा, आरती आदी  होईल. सायंकाळी ६ वाजता देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येईल. उर्वरित २ दिवसही धार्मिक विधी होतील.

पालखी मिरवणूक श्री चावडेश्‍वराला श्रीफळ अर्पण करून श्री पाजेश्‍वराच्या स्थानाकडे जाते. श्री पाजेश्‍वराला श्रीफळ अर्पण करून श्रींची पालखी प्रत्येकाच्या घराकडे ओटी भरण्यासाठी निघते आणि शेवटी धवर्ण्याजवळ श्री बिंधेश्‍वराला श्रीफळ अर्पण करून मागे फिरते.

मंदिरात साजरे होणारे अन्य कार्यक्रम

गुढीपाडवा, श्रावणी सोमवार, श्री लक्ष्मीपूजन, धेंडलो उत्सव (बलीप्रतिपदा), तुळशीविवाह, धालोत्सव, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम वर्षभर साजरे केले जातात.

संकलक : श्री. मनोहर महादेव नाईक, वडाभाट, नेवरा, तिसवाडी, गोवा.