पाश्‍चात्त्यांची कालबाह्य कालगणना

वर्ष १५८२ मध्ये ११ दिवस गायब करण्यात आले, तो ऑक्टोबर मास

इटलीत उदयाला आलेले रोमन ख्रिश्‍चन मुळात शांतीप्रिय नव्हते. स्वतःचा काल्पनिक धर्म इतरांवर लादण्यासाठी, स्वतःचे शौर्य (नव्हे क्रौर्य) गाजवण्यासाठी युद्ध करणे, ही त्यांची मूळ प्रवृत्ती होती. शांतीप्रियता, मानवतावाद, अन्य धर्मियांचा सन्मान करणे, निसर्गाचा अभ्यास करणे या गोष्टी त्यांना परावलीच्या होत्या, हे तेथील रक्तरंजित इतिहास वाचल्यावर सहज लक्षात येते. तेथील शूर सेनापतींनी स्वतःचे कौशल्य अन्य संस्कृतींचा विध्वंस करण्यासाठी पणाला लावले. यामुळेच त्यांची प्रत्येक कृती, विचारधारा ही क्रौर्याशी निगडीत होती. यातून कालगणनाही सुटली नाही. युद्धाचे नियोजन अचूक करणे आणि विजय मिळवणे यांसाठी त्यांना कालगणनेची आवश्यकता पडली असावी, तिचा हा इतिहास वाचल्यावरच लक्षात येते. पुढे ही कालगणना

सौ. समृद्धी गरुड

किती निसर्गविसंगत होती, हे गेल्या २ सहस्र ८०० वर्षांत ६ वेळा उघड झाले. या गोष्टी आता विज्ञाननिष्ठ भारतियांसमोर याव्यात आणि कालसुसंगत कालगणनेचा अभ्यास आरंभ व्हावा, हीच श्रीमन्नारायणाच्या चरणी प्रार्थना !

१. विश्‍वाशी सुसंगत असलेली पंचांगातील कालमापन पद्धत

​विश्‍वात उत्पन्न झालेल्या प्रत्येक वस्तूला स्वतःचा काळ असतो; म्हणूनच ‘काळ हा सापेक्ष आहे’, असे आईनस्टाईन म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे विश्‍व स्थिर भासत असले, तरी ते स्थिर नाही. ते गतीमान आहे. म्हणून गतीमान वस्तूंना काळ असतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय ही काळगतीची मूलभूत प्रवृत्ती आहे. सापेक्षतावादाचा विचार केल्यास विश्‍वातील प्रत्येक वस्तूचे स्वतंत्र अचूक कालमापन होणे आवश्यक आहे. यामध्ये आरंभ, मध्य आणि शेवट या कालावस्था अचूक असल्या पाहिजेत. आईनस्टाईनने १९ व्या शतकात मांडलेला सिद्धांत भारतियांना कोट्यवधी वर्षांपूर्वी ज्ञात असावा. याचे प्रमाणे म्हणजे विश्‍वातील प्रत्येक ग्रह, उपग्रह, तारे यांचे अचूक कालमापन भारतियांनी केले होते, हे पंचांगाच्या अभ्यासावरून स्पष्ट होते.

२. कालगणनेचे अचूक ज्ञान असलेले वैदिक साहित्य

​‘द्वादशमासै: संवत्सर: ।’ अर्थात् एका वर्षात १२ मास असतात. याचा प्रथम उद्गाता ऋग्वेद आहे. ऋग्वेद जगातील सर्वांत प्राचीन वेद आहे, याविषयी आता कुणाचेच दुमत नाही. हा सिद्धांत जेव्हा प्रचलित होता, तेव्हा भूतलावर ख्रिश्‍चन संस्कृतीची बीजधारणाही झाली नव्हती. येशू ख्रिस्त जन्माच्या ४५ वर्षांच्या आधी रोमन सम्राट ज्युलियस सीझरला ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने वर्षाचे १२ मास केले; मात्र त्याला वर्षातील दिनमान नीट मोजता आले नाही. ख्रिस्ती कालगणनेत कसे घोटाळे होत गेले आणि स्वतःच्या पूर्वजांचे अज्ञान झाकण्यासाठी केवळ कागदी गणिते करून त्यात सुधारणा करण्याचा कसा खटाटोप केला, याचा रोचक इतिहास पुढे देत आहे.

३. पाश्‍चात्त्यांची कालगणना अवैज्ञानिक

​मुळात काळाचीही गणना करायची असते, याचे ज्ञान इ.स. पूर्व ८०० मध्ये रोमन ख्रिश्‍चनांना झाले; पण त्यातील दिवसांची संख्या कशी निश्‍चित करावी, हे त्यांना कळत नव्हते. याचे कारण त्यांची कालगणना निसर्गाशी नव्हे, तर निवळ युद्ध करण्यासाठी केलेली रचना होती. कोणतेही वैज्ञानिक संशोधन केले नव्हते. प्रथम राजा रोमूलस याने रोममध्ये ३०४ दिवसांचे वर्ष आणि मार्च ते डिसेंबर असे १० मास असलेली कालगणना चालू केली. मार्च, मे, क्विंटीलिस (सध्याचा जुलै) आणि ऑक्टोबर हे ४ मास ३१ दिवसांचे, तर एप्रिल, जून, सेक्टीलीस (सध्याचा ऑगस्ट), सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे ६ मास ३० दिवसांचे अशी ती कालगणना होती.

४. धार्मिक युद्धाला पोषक अशी कालगणना करणारे रोमन

​येशू ख्रिस्त जन्माच्या आधी ८०० वर्षे रोममध्ये कालगणना अस्तित्वात आणली. रोमन ख्रिश्‍चनांनी १० मासांचे वर्ष मानले. यातील बहुतेक मासांना रोमन देवतांची नावे देऊन वर्षाचा आरंभ ‘२५ मार्च’ असा निश्‍चित केला. यामागचे कारण म्हणजे युद्धात विजय मिळावा, हेच होते. ज्याला आम्ही मंगळ ग्रह म्हणतो, त्याला रोमन लोक ‘मार्स’ म्हणतात. याचा अपभ्रंश म्हणजे ‘मार्च’. मार्स ही रोमन ख्रिश्‍चनांची युद्धदेवता आहे. या युद्धदेवतेची कृपा व्हावी, यासाठी त्यांनी वर्षाचा आरंभ मार्चमध्ये केला. यात चंद्र आणि पृथ्वी यांच्या भ्रमंतीचा काहीही संबंध नाही.

५. न्यूमा पॉपिलिअसने केली पहिली सुधारणा

​रोमूलस याच्या कालगणनेत मोठ्या चुका आहेत, हे लक्षात आल्यानंतर न्यूमा पॉपिलिअस या रोमन राजाने १० मासांमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन मासांची भर टाकून ३५५ दिवस असलेले १२ मासांचे वर्ष आरंभ केले. ते करतांना त्याने ३१ दिवसांच्या मासात पालट केला नाही; परंतु ३० दिवस असलेल्या सहा मासांतील प्रत्येकी एक दिवस कमी करून जानेवारी २९, तर फेबुवारी २८ दिवसांचा केला. याला कोणताही वैज्ञानिक अथवा शास्त्रीय आधार नव्हता. केवळ स्वतःची सोय होती.

६. ऋतूचक्राशी मेळ घालण्यासाठी प्रति २ वर्षांनी १३ वा मास जोडण्याच्या प्रथेचा आरंभ

​न्यूमा पॉपिलिअसने सुधारणा केली, तरीही कालगणनेचे गणित जुळत नव्हते; कारण त्याचा ऋतूंशी मेळ बसत नव्हता. प्रत्येक वर्षी ऋतू पुढे सरकायचे. वर्ष १५ दिवस आधी चालू व्हायचे; म्हणून दर २ वर्षांनी फेब्रुवारीनंतर १३ वा मास जोडून ऋतूचक्राशी ओढून ताणून कालगणनेचा मेळ घालण्याची प्रथा पडली. याचा दुष्परिणाम असा झाला की, इ.स. पूर्व ४६ पर्यंत या कालगणनेत ९० दिवसांचा फरक पडला होता. यामुळे जवळजवळ ७५० वर्षे कालगणनेत प्रचंड त्रुटी राहू लागल्या. ऋतू ३ मासांनी पुढे सरकू लागले.

७. कालगणना अचूक करण्यासाठी एका वर्षांत अकारण ९० दिवस वाढ करणे

​कालगणना अचूक करण्याच्या हेतूने रोमन सम्राट ज्युलियस सीझरने सोसिजिनीस या खगोलशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार ३५५ दिवसांच्या मूळ चांद्र कालगणनेचे रूपांतर ३६५ दिवसांच्या सौर कालगणनेत केले. त्या वेळी ९० दिवसांची तफावत न्यून करण्यासाठी इ.स. पूर्व ४६ हे एकच वर्ष ४५५ दिवसांचे करावे लागले. यालाही खगोलशास्त्रीय आधार नव्हता. याखेरीज मार्च, मे, क्विंटीलीस (जुलै), सप्टेंबर, नोव्हेंबर, जानेवारी हे ६ मास ३१ दिवसांचे, तर एप्रिल, जून, सेक्टीलिस (ऑगस्ट), ऑक्टोबर, डिसेंबर हे ५ मास ३० दिवसांचे आणि फेब्रुवारी मास २९ दिवसांचा अशी रचना झाली.

८. घोळ मिटवण्यासाठी ‘ लीप वर्षा’ची संकल्पना आली अस्तित्वात

ऋतू सूर्याच्या प्रभावाने होतात, म्हणजे एक सौरवर्ष ३६५ दिवस ६ घंटे ९ मिनिटे १० सेकंद इतक्या वर्षांचे होते. याचाच अर्थ नवे वर्ष इतक्या काळाने चालू व्हायला पाहिजे; पण दिवसाच्या मध्येच ६ घंट्यांनी नवीन दिनांक चालू करणे अव्यवहार्य होते. त्यामुळे ज्युलियस कॅलेंडरमध्ये प्रत्येक वर्ष ३६५ दिवसांचे केले. ४ वर्षांत ६ घंट्यांची बाकी २४ तास म्हणजे पूर्ण दिवस होत असल्याने दर ४ वर्षांनी १ दिवस जास्त असणारे ३६६ दिवसांचे ‘लीप वर्ष’ गणले जाऊ लागले.

९. ज्युलियसच्या स्मरणार्थ क्विंटीलस मासाचे नामकरण झाले जुलै !

​ज्युलियस सीझर हा अहंकारी आणि हुकूमशहा होता. त्याने रोमन लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते; म्हणूनच शेवटी त्याची रोममध्ये हत्या करण्यात आली. असे असले तरी ज्युलिअसच्या समर्थकांनी त्याच्या शौर्याचे (?) जनतेला (जी त्याच्या विरोधात होती) सदैव स्मरण रहावे, यासाठी इ.स. पूर्व ४४ मध्ये क्विंटीलस मासाचे नामकरण ज्युलियस (जुलै) असे केले.

१०. सम्राट ऑगस्टसच्या अजरामर होण्याच्या हट्टापायी कालगणनेत पालट करणे

​ज्युलियस हा आधी रोमन सैन्याचा सेनापती होता. नंतर त्याने स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपोटी तेथील प्रजासत्ताक नष्ट करून सर्व कारभार स्वतःच्या हाती घेतला. अनेक देशांवर त्याने अकारण युद्ध लादले. यामुळे रोमन जनता त्याच्यावर प्रचंड अप्रसन्न होती. पुढे सत्तेच्या हव्यासापोटी त्याचा पुतण्या ऑक्टेवियन याने त्याची क्रूरपणे हत्या केली, म्हणजे ज्युलियसला त्याच्या कर्माचे फळ मिळाले. इतकेच नव्हे, तर ऑक्टेवियन याने ज्युलियसच्या सगळ्या मुलांचीही हत्या केली. यामुळे रोमन सिनेटला आनंद झाला. सिनेटने ऑक्टेवियन याला ‘ऑगस्टस’ असे नाव दिले. ऑगस्टस म्हणजे महान ! पुढे ऑगस्टस सीझर रोमन सम्राट झाला. इ.स. पूर्व ८ मध्ये ऑगस्टसने स्वतःचे नाव अजरामर करण्यासाठी ‘सेक्टीलीस’ मासाचे नामकरण ‘ऑगस्ट’ असे केले. त्याही पुढे ऑगस्टसच्याच हट्टावरून फेब्रुवारीतील १ दिवस न्यून करून ऑगस्ट मास ३१ दिवसांचा करण्यात आला.

११. चूक सुधारण्यासाठी कालगणनेतून ११ दिवस गायब करणारे तेरावे पोप ग्रेगरी !

​इ.स. पूर्व ८ मध्ये ऑगस्टसने केलेल्या आडमुठ्या पालटामुळे इ.स. १५८२ पर्यंतच्या या कालगणनेत १० दिवसांचा फरक पडला. २२ जून हा दक्षिणायनाचा दिवस १२ जूनपर्यंत अलिकडे सरकल्याचे रोमचे १३ वे पोप ग्रेगरी यांच्या लक्षात आले. महत्त्वाचे म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस, नाताळ आणि नववर्षाचा आरंभ आदी चर्चचे उत्सव चुकीच्या दिवशी साजरे होऊ लागले. आता हा ताळमेळ कसा मिटवायचा, याची घोर चिंता पोप ग्रेगरी यांना लागली. मग त्यांनी सर्व गणिती नियमांची ओढाताण करून ११ मार्चवर गेलेला वसंत ऋतूचा पहिला दिवस २१ मार्चवर आणण्यासाठी १५८२ या वर्षी दिनदर्शिकेतून ११ दिवस काढले. त्यानुसार ‘४ ऑक्टोबर’नंतर दुसर्‍या दिवशी ‘१५ ऑक्टोबर’ हा दिनांक दिनदर्शिकेत घातला, म्हणजे ४ ऑक्टोबरला रात्री झोपलेली माणसे सकाळी १५ ऑक्टोबरलाच उठली. (हा पोप यांनी केलेला चमत्कार नव्हे का ?) याखेरीज १ जानेवारी हा नववर्षारंभ पकडावा, असे त्या वेळेस घोषित करण्यात आले.

१२. कालगणना जुळवण्यासाठी निवळ कागदावर गणिती समीकरणे मांडून खगोलशास्त्राला छेद देणे

​पोप ग्रेगरी यांनी इ.स. १५८२ या वर्षी जरी ऋतूचक्राशी कालगणना जुळवून घेतली असली, तरी त्यात प्रत्येक चौथ्या वर्षी आणि ४०० वर्षांनी ऋतूचक्र यांच्यात भेद होणार, याची कल्पना त्यांना आधीच आली. ती कशी दूर करायची, यावर विचार करून त्यांनी एक नियम सिद्ध केला. या नियमामुळे ४०० वर्षांत ३ दिवस २ घंटे ५२ मिनिटे आणि ४८ सेकंद एवढी तफावत मापनात पडते; म्हणून ३ दिवस कमी करण्यासाठी शतकी वर्षाला ४०० ने नि:शेष भाग जात असेल, तरच ते ‘लीप वर्ष’ गणायचे असा नियम केला. अशा प्रकारे ‘ग्रेगरीयन कॅलेंडर’ अस्तित्वात आले.

१३. ब्रिटिशांनी १७५२ या वर्षी केला ग्रेगरीयन कॅलेंडरप्रमाणे पालट !

​रोमच्या चर्चने ‘ग्रेगरीयन कॅलेंडर’ अस्तित्वात आणल्यानंतर जिथे जिथे रोमन सम्राटांची अथवा धर्मगुरूंची आक्रमणे झाली होती, त्या देशांवर हे कॅलेंडर लादण्यात आले. कोणताही वैज्ञानिक, शास्त्रीय आधार नसतांनाही केवळ धर्मगुरूंनी सांगितल्यामुळे ख्रिस्ती संप्रदायांनी त्याचा स्वीकार करून प्रचार आरंभ केला; मात्र ब्रिटनने तो लवकर स्वीकारला नाही; कारण ब्रिटनमधील लोक रोमन कॅथोलिकांना मानत नव्हते. त्यांनी केवळ ‘ज्युलियस कॅलेंडर’चा स्वीकार केला होता; पण १७५२ या वर्षी कालमानात मोठ्या चुका होत आहेत, हे लक्षात आल्यानंतर ब्रिटनने नमते घेत ‘ग्रेगरीयन कॅलेंडर’ लागू करण्याचा निर्णय घेतला. या कॅलेंडरशी कालगणना जुळवून घेण्यासाठी ब्रिटनमध्ये त्या वर्षी ‘२ सप्टेंबर’ या दिनांकाच्या दुसर्‍या दिवशी ‘१४ सप्टेंबर’ असा दिनांक ग्राह्य धरण्याचे निश्‍चित केले, म्हणजे पुन्हा आधीचाच चमत्कार ब्रिटनमध्येही घडला. हीच कालगणना पुढे मेकॉले याने भारतात लागू केली. तेव्हापासून भारतातही ग्रेगरीयन कॅलेंडर लागू झाले. अर्थात् या कॅलेंडरचा विश्‍वाच्या कालगणनेशी काहीही संबंध नाही. केवळ रोमन सम्राट आणि रोमन चर्च यांनी स्वतःसाठी केलेली गणिती सोय आहे, हे लक्षात येते.

१४. ख्रिस्त्यांनी पसरवलेली अवैज्ञानिक कालगणना कालबाह्य करण्याची आवश्यकता

​ख्रिस्ती धर्मियांनी पर्यावरणविसंगत कालगणना जगावर थोपवली. स्वतःला विज्ञानवादी म्हणवणार्‍या पाश्‍चात्त्य देशांनी याची चिकित्सा करून ती कालबाह्य करणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी कधीही त्याला विरोध केला नाही. भारतातही स्वातंत्र्यानंतर ही अवैज्ञानिक कालगणना चालू ठेवण्यात आली. रोमचे पोप आणि क्रूर सम्राट यांनी पसरवलेली ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अन् पर्यावरणपूरक कालगणना पुन्हा चालू होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

– सौ. समृद्धी संतोष गरुड, पर्वरी, गोवा.

(संदर्भ : सुलभ ज्योतिषशास्त्र, लेखक : कृष्णाजी विठ्ठल सोमणशास्त्रीजी; ‘कालगणना’, लेखक : मोहन आपटे; ‘कॅलेंडर म्हणजे पंचांगाचाच नवा अवतार’, लेखक : श्री. हेमंत मोने; ‘कथा महिन्यांच्या नावाची…’, दैनिक ‘दिव्य मराठी’; ‘जुलै’, लेखक : अ. ना. ठाकूर; ‘इंग्रजी महिन्यांचे घोळ’, लेखक : अविनाश जोशी; ‘२ सप्टेंबरला झोपलेली माणसं थेट १४ सप्टेंबरला उठली : इंग्रजी इतिहासातील चमत्कारिक वर्ष’, संकेतस्थळ : इन मराठी)