बदायू (उत्तरप्रदेश) येथे अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

बदायू (उत्तरप्रदेश) – येथील उघैती गावामध्ये ५० वर्षीय अंगणवाणी सेविका असलेल्या महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी खुपसून आणि नंतर तिचा पाय मोडून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

१. ३ जानेवारी या दिवशी ही महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती; मात्र परत घरी आली नाही. महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीप्रमाणे, मंदिरातील पुजारी आणि इतर दोघांनी पीडितेचा मृतदेह तिच्या घरी आणून ठेवला. त्यांच्याकडे चौकशी करण्यापूर्वीच ते निघून गेले, असे कुटुंबियांनी म्हटले आहे.

२. पोलिसांनी पुजार्‍याची चौकशी केल्यावर त्याला ही महिला विहिरीत पडल्याचे आढळून आले. तिला बाहेर काढल्यावर तिचा मृत्यू झाला. त्यामुळे महिलेचा मृतदेह तिच्या घरी देऊन आलो, असे पुजार्‍याने सांगितले.

३. पोलिसांनी पीडित महिलेचा मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालातून महिलेवर बलात्कार करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींच्या शोधासाठी ४ पथके सिद्ध करण्यात आली आहेत.

४. पीडितेच्या कुटुंबियांनी पुजार्‍याने बलात्कार करून खून केल्याचा आरोप केला आहे. कुटुंबियांनी पोलिसांवरही आरोप करत ‘पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यासाठी विलंब केला’, असे म्हटले आहे.