२६ जानेवारीपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्ग, वांद्रे-वरळी सेतूसाठी ‘फास्ट टॅग’ बंधनकारक

मुंबई – मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू या मार्गांवर प्रवासासाठी २६ जानेवारीपासून ‘फास्ट टॅग’ बंधनकारक करण्यात आल्याचे एम्.एस्.आर्.डी.सी.ने स्पष्ट केले आहे.

एम्.एस्.आर्.डी.सी.ने वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्ग आणि जुन्या महामार्गावर सर्व पथकर नाक्याच्या सर्व मार्र्गिकांवर सध्या ‘फास्ट टॅग’ यंत्रणा कार्यान्वित आहे; मात्र वाहनचालकांमध्ये याविषयी जागृती व्हावी, सर्वांना ‘फास्ट टॅग’ घेण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून २६ जानेवारीपर्यंत काही मार्गिका हायब्रिड (रोख आणि ‘फास्ट टॅग’ दोन्ही एकत्र) पद्धतीने कार्यरत रहातील. २६ जानेवारीपासून मात्र ‘फास्ट टॅग’ बंधनकारक असेल. मुंबईतील वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरही ‘फास्ट टॅग’ बंधनकारक आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्ग

मुंबई क्षेत्रातील पाच पथकर नाके एम्.एस्.आर्.डी.सी.च्या अखत्यारीत असून दहिसर वगळता चार पथकर नाक्यांच्या काही मार्गिकांवर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून महामंडळाने पुढाकार घेऊन ‘फास्ट टॅग’ कार्यरत केले. सर्व मार्गिकांवर ‘फास्ट टॅग’ यंत्रणा कार्यरत करण्यासाठी तेथील रचनेत पालट करावा लागणार आहे. मुलुंड (पूर्व आणि पश्चिम) आणि दहिसर येथील नाक्यांवर पुढील दोन मासांत ‘फास्ट टॅग’चा वापर बंधनकारक केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.