प्रत्येक हिंदु भगिनीमध्ये शौर्य जागृत करण्याची आज नितांत आवश्यकता ! – कु. पूजा धुरी, हिंदु जनजागृती समिती

गोवा येथील महिला धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन शौर्यजागृती सप्ताह’

कु. पूजा धुरी

फोंडा – आपल्या प्रत्येक हिंदु भगिनीमध्ये शौर्य जागृत करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ पातशाह्यांचा निःपात करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी अगदी बालवयापासून युद्धकला आत्मसात करून इंग्रजांना पाणी पाजले. त्यांच्यासह अहिल्याबाई होळकर, राणी चेन्नमा, प्रीतीलता वड्डेदार यांचा आदर्श समोर ठेवून प्रत्येक भगिनीने आता रणरागिणी व्हायला पाहिजे. स्वरक्षण प्रशिक्षण शिकत असतांना शारीरिक क्षमता वाढवण्यासमवेत मानसिक क्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढवणे तितकेच आवश्यक आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईप्रमाणे आपणही आज सिद्ध व्हायला हवेे. यासाठी मनोबल वाढवणे आणि ईश्‍वराचा आशीर्वाद पाठीशी असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. पूजा धुरी यांनी केले. युवतींमधील शौर्य जागृत करणे, जीवनातील साधनेचे आणि काळानुसार स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे महत्त्व बिंबवणे या दृष्टीकोनातून येथील युवती अन् महिला धर्मप्रेमींसाठी काही दिवसांपूर्वी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन शौर्यजागृती वर्ग’ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या. या सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. पूजा मांजरेकर यांनी केले.

धर्माभिमानी महिलांचे मनोगत

गौरी साईल – दळणवळण बंदीच्या काळातही आम्हाला ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याची संधी मिळाली. एखाद्या प्रसंगामध्ये मी स्वतःचे रक्षण कसे करू शकते, हे मला शिकायला मिळाले.

श्रद्धा बागकर – प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी होऊन माझे आत्मबळ वाढले. आता कोणत्याही प्रसंगामध्ये मी प्रतिकार करू शकते, हा आत्मविश्‍वास निर्माण झाला. ‘देवीची शक्ती कार्यरत आहे’, असे जाणवते. नियमित प्रशिक्षणाचा सराव होतो आणि उत्साह वाढतो. पुष्कळ आनंद मिळतो.