पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन दिले निवेदन
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून अवैध व्यवसाय का बंद करत नाही ?
कणकवली – तालुक्यातील सांगवे, कनेडी बाजारपेठेतील अवैध व्यवसाय बंद करा. मद्य, पेट्रोल, गॅस सिलिंडर यांची अवैध विक्री करणार्यांवर कारवाई करा, अशी मागणी करत येथील ग्रामस्थांनी कणकवली पोलीस ठाण्यावर धडक दिली. या वेळी पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, सांगवे, कनेडी बाजारात राजरोसपणे गॅस सिलिंडरची विक्री होते, तसेच गोवा बनावटीचे मद्य आणि मटका व्यवसायही केला जातो. काही घरांमधून पेट्रोलविक्रीही चालू असते. या व्यवसायात असलेल्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायतीची किंवा पुरवठा विभागाची अनुमती घेतलेली नाही. सांगवे, कनेडी बाजारामध्ये गेली अनेक वर्षे गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सातत्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. असे लोक एकत्र येऊन कुणालाही धमकावणे आणि मारहाण करणे, असे प्रकार करत आहेत. या प्रकारांची खातेनिहाय चौकशी करून तातडीने कारवाई करावी अन्यथा पोलीस ठाण्यासमोर सांगवे ग्रामस्थ उपोषण करतील, अशी चेतावणी देण्यात आली आहे.
या वेळी माजी सभापती सुरेश सावंत, सांगवे सरपंच मयुरी मुंज, उपसरपंच प्रदीप सावंत, पंचायत समिती सदस्य स्मिता मालडीकर, माजी सरपंच महेश सावंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.