कोल्हापूर – राज्यशासनाच्या वतीने पुढील मासापासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी यांचा समावेश आहे. खासगी आरोग्य सेवतील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी, शहर आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
कोरोना लसीकरणाच्या कार्यवाहीच्या पूर्व सिद्धतेसाठी जिल्हा कृतीदल समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सभागृहात १० डिसेंबर या दिवशी झाली. त्या वेळी हे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. या वेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
नोडल अधिकारी डॉ. देसाई म्हणाले, पहिल्या टप्प्यासाठी ५ लाख ५७ सहस्र १७६ लाभार्थी असून जिल्ह्यात एकूण १२२ शीतसाखळी केंद्रे आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, पहिल्या गटात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील आरोग्यसेवक, कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी अन् एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश आहे. दुसर्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्र कृतीदल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचारी यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक तसेच नगरपालिका अन् महानगरपालिकेतील कर्मचारी यांचा समावेश आहे. तिसर्या गटात ५० वर्षांवरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा ५० वर्षांखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.