इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या शाळा चालू करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय नाही ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

मुंबई – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा आणि आरोग्य विषयक सूत्रे यांचा विचार करून, तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य अन् शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल. इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या शाळा चालू करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘काही जिल्ह्यांत इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरळीत चालू असून दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. सुदैवाने विद्यार्थी आणि शिक्षक यांना कोरोनाचे संक्रमण झालेले नाही, हे अत्यंत समाधानकारक आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार राज्यातील अन्य जिल्ह्यांतील शाळा चालू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल. राज्यशासनाने शिक्षक भरतीवरील बंदी उठवल्यामुळे आता भरती प्रक्रियेला वेग येईल. पहिल्या टप्प्यात इयत्ता

९ वी ते १२ वीच्या २ सहस्रांहून अधिक जागांसाठी शिक्षक भरती राबवण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी मासात निवड झालेल्या शिक्षकांची नावे घोषित करण्यात येतील.’’