सुरूंग स्फोटांमुळे हानी झालेल्यांना हानीभरपाई मिळावी अन्यथा आंदोलन करू ! – निगुडे ग्रामस्थांची चेतावणी

खनिजांच्या अतीउत्खननामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन संबंधित उपाययोजना प्रशासनाने स्वतःहून करायला हव्या होत्या ! प्रत्येक गोष्टीसाठी जनतेला आंदोलन का करावे लागते ?

 

सावंतवाडी – तालुक्यातील निगुडे, सोनुर्ली, वेत्ये आणि इन्सुली या गावांमध्ये असणार्‍या काळ्या दगडांच्या खाणीवर केल्या जाणार्‍या सुरूंग स्फोटांमुळे निगुडे गावातील १५६ घरांना तडे गेले आहेत, तसेच या परिसरातील रस्ते ट्रकमधून क्षमतेपेक्षा अधिक खनिज वाहतुकीमुळे खराब झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसह स्फोटांमुळे हानी झालेल्यांना हानीभरपाई मिळावी, अन्यथा २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी आंदोलन करू, अशी चेतावणी निगुडे गावचे सरपंच आणि ग्रामस्थ यांनी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, स्फोटांमुळे संबंधितांची तब्बल २१ लाख रुपयांची हानी झाली आहे. याविषयी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही ग्रामस्थांना हानीभरपाई मिळाली नाही. त्यामुळे याविषयी योग्य ते आदेश प्रशासनाला द्यावेत. या परिसरात होणार्‍या खनिज उत्खननाचे सर्वेक्षण करून नियमबाह्य उत्खननावर कारवाई करण्यात यावी. किती उत्खनन करण्यासाठी अनुमती दिली आहे, त्याची मर्यादा तपासावी. पर्यावरण विभागाचा अहवाल तपासण्यात यावा. यांसह ‘ओव्हरलोड’ खनिज वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांवरील छोटे पूल खराब झाले आहेत. ते खनिकर्म विभागाच्या निधीतून दुरुस्त करण्यात यावे.

हे निवेदन निगुडेचे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी आमदार केसरकर यांना दिले.