बाबरी मशिदीवर विद्यालयीन निबंध स्पर्धा
अशी मागणी का करावी लागते ? सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर होते, हे मान्य केले आहे. असे असूनही ‘बाबरीला विसरू नका’, असे सांगून फलक लावणे, निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल करणे या प्रकारांवर पोलीस आणि प्रशासन स्वतःहून बंदी का घालत नाही ?
पणजी – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या संघटनेकडून गोव्यातील इयत्ता १० वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बाबरी मशिदीवर आधारित अखिल गोवा निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याद्वारे ‘पी.एफ्.आय.’ समाजात द्वेष निर्माण करत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने गोव्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे. या निवेदनाची प्रत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही देण्यात आली आहे.
महासंचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. ‘पी.एफ्.आय.’ने ‘लेस्ट वी फॉरगेट’ (आम्ही विसरू यासाठी) या नावाने बाबरी मशिदीवर इयत्ता १० वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अखिल गोवा निबंध स्पर्धा आयोजित केल्याची ‘पोस्ट’ प्रसारमाध्यमांत प्रसारित केली आहे. यासाठी ८ डिसेंबर ही निबंध सादर करण्याची अंतिम दिनांक ठेवली असून त्यासाठी मडगाव, दवर्ली, पणजी, वास्को आणि म्हापसा येथे केंद्रे घोषित केली आहेत. या निबंध स्पर्धेचा निकाल १३ डिसेंबर या दिवशी आहे.
२. सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशिदीवर यापूर्वीच निकाल घोषित केला असल्याने ही निबंध स्पर्धा समाजातील ऐक्यास हानी पोचवणारी, त्याचप्रमाणे देशाची भावी पिढी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये द्वेष करणारी आहे.
३. ‘पी.एफ्.आय.’ ही आतंकवादी, देशविरोधी कारवाया करणारी आणि इस्लामिक स्टेटशी संबंध असलेली संघटना असल्यावरून केंद्र सरकार या संघटनेवर लक्ष्य ठेवून आहे. त्यामुळे भा.दं.वि. कलम १५३ अंतर्गत ‘पी.एफ्.आय.’वर आणि या निबंध स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई करावी.