जनता वसाहतींमध्ये रहाणार्‍या कुटुंबाला ९८ सहस्र ७८० रुपयांचे वीजदेयक !

महावितरणाचा भोंगळ कारभार ! महावितरणच्या या गोंधळामुळे त्यांनी जनतेची विश्‍वासार्हता गमावली आहे. त्यांच्यावर जनतेचा रोष ओढवल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

पुणे – महावितरणच्या वाढीव देयकाविषयी सध्या नागरिकांमध्ये पुष्कळ असंतोष निर्माण झाला आहे. यातच जनता वसाहतींमध्ये रहाणार्‍या पांडे कुटुंबियांना ९८ सहस्र ७८० रुपयांचे वीजदेयक आल्याने देयकाचे पैसे कसे भरणार ?, असा प्रश्‍न कुटुंबियांना पडला आहे. कुसुम पांडे या धुण्या-भांड्यांचे, तर त्यांचे पती सुरक्षा रक्षकाचे काम करतात.

याविषयी पांडे म्हणाले की, वर्ष २०१८ मध्ये आमचे जुने मीटर जळल्याने महावितरणकडे नवीन मीटर बसवण्याची मागणी केली होती. त्यानंतर महावितरण विभागाने अन्य कुणाचे तरी मीटर बसवून दिले. तेव्हा आमचे देयक प्रतिमाह ७०० ते ८०० रुपये येत होते; परंतु ऑगस्ट २०१९ मध्ये ७२ सहस्र ५०० रुपये ऐवढे वीजदेयक आले आहे. याविषयी महावितरण विभागाच्या कार्यालयात अनेक वेळा जाऊनही वीजदेयकामध्ये पालट झाला नाही. दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये वीज वापरलेली नसतांनाही वीजदेयकाची रक्कम अधिक आलेली आहे. नवीन मीटरमध्ये आधीचे रिडिंग असल्याने जादा वीजदेयक आले आहे. प्रत्येक मासाला रिडिंग न घेतल्याने १४ मासांचे देयक विभागून दिले आहे, असे   महावितरण विभागाचे साहाय्यक अभियंता यांनी सांगितले.

(ज्यांचे देयक प्रतिमाह ७०० ते ८०० रुपये येत असतांना १४ मासांचे देयक ९८ सहस्रांहून अधिक येऊ शकते का ?, असा प्रश्‍न महावितरणच्या अधिकार्‍यांना का पडत नाही ? वीजदेयकांमधील गोंधळ पहाता महावितरणमधील संबंधित अधिकार्‍यांनी या समस्येच्या मुळाशी जाऊन ग्राहकांना न्याय मिळवून देणे अपेक्षित आहे. – संपादक)