राज्यात आचारसंहिता लागू : कोरोनाबाधित रुग्णांनाही मिळणार मतदानाचा अधिकार
पणजी– राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक शनिवार, १२ डिसेंबर, तर मतमोजणी १४ डिसेंबर या दिवशी होणार आहे. गोवा राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी ५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निवडणूक घोषित झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे आणि ती १४ डिसेंबर या दिवशी मध्यरात्रीपर्यंत लागू रहाणार आहे. जिल्हा पंचायतीच्या विद्यमान मंडळाची कारकीर्द २३ मार्च २०२० या दिवशी संपुष्टात आल्याने निवडणूक १५ मार्च २०२० या दिवशी होणार होती; मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने काही सूत्रे
१. १२ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान
२. राज्यातील सुमारे ८ लाख मतदार २०३ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार
३. राज्यात दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा, अशा २ जिल्हा पंचायतींच्या एकूण ४८ मतदारसंघांसाठी निवडणूक होणार. दक्षिण आणि उत्तर गोवा जिल्हा पंचायतींमध्ये प्रत्येकी २५ मतदारसंघ आहेत. सांकवाळ जिल्हा पंचायतीमधील उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याने आणि नावेली जिल्हा पंचायतीच्या एका उमेदवाराचे निधन झाल्याने ही निवडणूक स्थगित ठेवण्यात आली आहे.
४. राज्यात उत्तर गोवा जि.पं.साठी १०४, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी ९६ उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामधील ३० मतदारसंघ राखीव आहेत.
५. मास्क घातल्याशिवाय मतदान करता येणार नाही.
६. घरी अलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी दिली जाणार आहे. मतदानाच्या शेवटच्या घंट्याला संबंधित मतदान केंद्रात त्यांना मतदान करण्याची संधी दिली जाणार आहे. राज्यात आजपर्यंत सुमारे १ सहस्र ३८४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत आणि सर्वांनी उपचारासाठी घरी अलगीकरणाचा पर्याय निवडला आहे.
७. निवडणूक प्रचार, पक्षाच्या बैठका, जाहीर सभा आणि कोणत्याही स्वरूपाची विज्ञापने देण्यावर बंदी आहे.
८. १४ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
९. राज्यातील ८६६ मतदान केंद्रांमध्ये मतदान केले जाणार आहे आणि यामधील १० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.
१०. प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी खर्चाची मर्यादा ५ लाख रुपये आहे.
११. ‘आम आदमी पार्टी’ २१ जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार आहे’, अशी माहिती पक्षाचे नेते वाल्मीकि नाईक यांनी दिली.
१२. ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ ३१ मतदारसंघांमध्ये निवडणूक लढणार असल्याची माहिती पक्षाचे नेते मनोज परब यांनी दिली.
पक्षवार उमेदवारांची सूची
जि.पं. निवडणूक पक्षपातळीवर लढवली जाणार आहे.
उत्तर गोवा जिल्हा पंचायत – भाजप – २५, काँग्रेस – २१, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, मगोप – ७, आप – ७, राष्ट्रीय समाज पक्ष – १
दक्षिण गोवा जिल्हा पंचायत – भाजप – १६, काँग्रेस – १६, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, मगोप – १०, आप – १३