कर्ज न फेडणार्यांची नावे जाहीर करण्यास ‘युनियन बँक ऑफ इंडिया’चा नकार
पुणे – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार, कर्ज परतफेडीची क्षमता असूनही जाणूनबुजून कर्जफेड न करणार्या किंवा कर्जाचे पैसे अन्य उद्देशासाठी वापरणार्या २५ लाखांहून अधिक कर्ज थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी प्रत्येक बँकेने रिझर्व्ह बँकेला आणि क्रेडिट रेटिंग आस्थापनांना कळवणे बंधनकारक आहे. या नियमावलीचा आधार घेत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ‘युनियन बँक ऑफ इंडिया’कडे माहिती अधिकारात थकबाकीदारांच्या नावांची यादी आणि थकित कर्जांची माहिती मागितली होती; मात्र ही नावे जाहीर करण्यात कोणतेही जनहित नसल्याचे कारण देऊन बँकेने माहिती नाकारली आहे.
याविषयी वेलणकर म्हणालेे की, पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणार्या सार्वजनिक बँका तपशील लपवून ठेवत आहेत. तसेच सर्वसामान्य कर्जदारांचे हप्ते थकल्यावर त्यांच्या वसुलीसाठी कर्जदाराच्या नाव, गाव, पत्त्यांसह मालमत्तेच्या लिलावाची जाहीर नोटीस दिली जाते. मग कर्जफेडीची क्षमता असूनही जाणीवपूर्वक ती न फेडणार्या थकबाकीदारांची आणि कर्जाचे पैसे अन्य उद्देशांसाठी वापरणार्यांची माहिती का गोपनीय ठेवायची ? (सर्वसामान्य कर्जदारांचे हप्ते थकल्यावर त्यांच्यामागे वसुलीसाठी तगादा लावणार्या अधिकोषांनी कर्ज न फेडणार्या थकबाकीदारांची माहिती गोपनीय ठेवणे अन्यायकारकच आहे. – संपादक )