मुंबई – महाविकास आघाडी ही जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झाली आहे. कितीही संकटे आली, तरी महाराष्ट्र घाबरला नाही आणि घाबरणार नाही. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यातील सत्ता स्थापनेला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सह्याद्री अतिथीगृह येथे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडून ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’, या पुस्तिकेचा प्रकाशन सोडला झाला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी वरील विधान केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अन्य मंत्री उपस्थित होते.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या काळात रुग्णसंख्या असो कि मृत्यूसंख्या राज्यशासनाने त्यात लपवाछपवी केली नाही. नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या पाठीशी हे शासन ठामपणे उभे आहे. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतांनाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भक्कमपणे काम केले जात आहे.’’