‘मी आणि संभूसकाका आम्ही दोघे मागील ८ वर्षे ठाणे जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत एकत्र सेवा केली. या कालावधीत माझ्या लक्षात आलेली संभूसकाकांची काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. चिकाटी
आम्ही ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना संपर्क करायला जायचो. त्या वेळी त्यांची भेट घेण्यासाठी आम्हाला अनेक घंटे थांबावे लागायचे. आम्हाला सेवेनिमित्त त्यांच्याकडे पुनःपुन्हाही जावे लागायचे. तेव्हा संभूसकाका न कंटाळाता माझ्या समवेत यायचे. नंतरही ते चिकाटीने आणि सातत्याने त्यांच्याशी समन्वय करायचे.
२. क्षात्रवृत्ती
काका मुळात अतिशय नम्र, प्रेमळ, मनमिळाऊ होते. त्यांची पडते घेण्याची (न्यूनपणा घेण्याची) वृत्ती होती; मात्र हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्यात ते सात्त्विक त्वेषाने अन् क्षात्रवृत्तीने सेवा करायचे. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी पोलिसांची अनुमती मिळवणे, आंदोलनासाठी अनुमती मिळवणे, विडंबनाच्या विरोधात मोहिमा राबवणे’ इत्यादी सेवांमध्ये त्यांचे क्षात्रतेज जागृत व्हायचे.
३. सेवाभाव
३ अ. कुठलीही सेवा स्वीकारून ती परिपूर्ण करणे : काकांना शारीरिक आणि आर्थिक मर्यादा असूनही ते राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती या कार्यात झोकून देऊन सेवा करायचे. त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत कुठलीही सेवा केव्हाही सांगितली, तरी ते ती सेवा लगेच स्वीकारून पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. त्यांना एखादी सेवा येत नसेल, तर ते ती सेवा शिकून घेऊन तळमळीने पूर्ण करायचे.
३ आ. ठाणे जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत असलेल्या सर्व सेवा तळमळीने पूर्ण करणे : पूर्वी माझ्याकडे मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांच्या हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयाची सेवा होती. त्या वेळी काका ठाणे जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या सेवा करायचे. ते तळमळीने आणि चिकाटीने हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत असलेल्या सेवा पुढाकार घेऊन पूर्ण करायचे. त्यामुळे मला ठाणे जिल्ह्यातील कार्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता भासत नसे. ते ठाणे जिल्ह्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा, आंदोलने, निदर्शने, निषेध फेर्या, निवेदन देणे, अन्य उपक्रम इत्यादींचे नियोजन करणे, त्यांचा प्रसार करणे, अर्पण गोळा करणे, धर्मप्रेमी आणि लोकप्रतिनिधी यांना संपर्क करणे’ इत्यादी सेवा करायचे.
३ इ. काकांनी हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत चांगली जनसंपर्क सेवा केल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ समितीशी चांगल्या प्रकारे जोडले जाणे : काकांंच्या सेवेच्या तळमळीमुळे हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सर्व सेवा, मोहिमा अन् उपक्रम यशस्वी झाले. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील संप्रदायांचे प्रमुख, संघटना प्रमुख, लोकप्रतिनिधी, मंत्री, हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक, अधिवक्ते इत्यादींना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडून ठेवले होते. काकांच्या चांगल्या सहकार्यामुळे हिंदुत्वाच्या कार्यात आम्ही सर्व नवीन असतांनाही ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे हिंदुत्वाचे कार्य चांगल्या प्रकारे उभे राहिले.
४. काका आणि त्यांचे कुटुंबीय यांनी साधना आणि सेवा करतांना केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता वाटणे
काकांनी त्यांच्या कुटुंबियांनाही सेवा आणि साधना करण्यासाठी साहाय्य केले. ठाणे येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्याच्या निमित्ताने मी डोंबिवली येथे गेलो की, ते मला त्यांच्या घरी घेऊन जायचे. तेथील सेवा झाल्यावर आम्ही त्यांच्या घरी जेवण करून विश्रांती घ्यायचो. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मला सेवा अन् साधना करतांना केलेल्या साहाय्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. ‘त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात आम्हा साधकांना सर्वतोपरी साहाय्य करून प्रेम दिले’, त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो.
५. प्रार्थना
मला काकांकडून तळमळ, चिकाटी, प्रामाणिकपणा, नम्रता, गुरुकार्याशी एकनिष्ठता, प्रेमभाव, मनमिळाऊ वृत्ती इत्यादी अनेक गुण शिकायला मिळाले. ‘त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळून त्यांची आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.११.२०२०)