तारकर्ली येथे पर्यटकांची स्थानिकांना मारहाण

राजकीय मध्यस्थीनंतर प्रकरणावर पडदा

मालवण – पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या तारकर्ली गावात २ डिसेंबरला रात्री पर्यटकांच्या चारचाकी वाहनाने स्थानिक दुचाकीस्वारास धडक दिली. याविषयी विचारणा करण्यास गेलेल्या ग्रामस्थांना चारचाकीतील पर्यटकांनी मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोचल्यानंतर स्थानिक राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनंतर कोणतीही तक्रार न देता प्रकरण मिटवण्यात आले.

मुंबई येथून आलेले पर्यटक २ डिसेंबरला रात्री ९ वाजता तारकर्ली येथून माघारी परतत असतांना एका दुचाकीस्वारास त्या पर्यटकांच्या गाडीची धडक बसली. स्थानिक ग्रामस्थांनी काही अंतरावर गाडी थांबवून याविषयी त्यांना खडसावले. त्या वेळी गाडी चालक आणि गाडीतील अन्य व्यक्ती यांनी अर्वाच्च भाषा वापरल्याने येथे तणाव निर्माण झाला. या वेळी एका स्थानिकास मारहाण करण्यात आली, तर एका ग्रामस्थाच्या डोक्यावर दगड मारण्यात आला. एका स्थानिक महिलेलाही पर्यटकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अखेर ग्रामस्थांनी सर्व पर्यटकांना पोलीस ठाण्यात नेले अन् कारवाईची मागणी केली; मात्र अखेर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

अशा पर्यटकांना आवर घालणे आवश्यक असल्याचे मत

मालवण येथे प्रतिवर्षी लाखो पर्यटक येतात. बहुसंख्य पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटतात. त्यांचा कुठलाही त्रास स्थानिकांना नसतो; मात्र काही वेळा मद्यपी पर्यटक धिंगाणा घालणे, बेदरकार गाड्या चालवणे, अपघात करून पळून जाणे, अरेरावी करणे, असे प्रकार करतात. सातत्याने असे प्रकार घडत असतील, तर अशा पर्यटकांना आवर घालणे आवश्यक असल्याचे मत येथील ग्रामस्थ आणि व्यावसायिक यांनी व्यक्त केले.