महाविकास आघाडी ५ वर्षे चालेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई – राज्यशासनातील प्रत्येकजण समर्थपणे दायित्व निभावत असून हे शासन ५ वर्षे चालेल, असा विश्‍वास महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीला १ वर्ष झाल्यानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात ‘महाराष्ट्र्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही’, या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांसह अन्य नेतेही उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले नेतृत्व केले. त्यांना प्रशासनाचा अनुभव नव्हता; तरी त्यांच्या चातुर्यात कमतरता दिसत नाही. राज्यात शेती कायदाविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन चालू आहे, ते राज्यकर्त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष न दिल्याचा परिणाम आहे. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘कोरोना संकटात शासन डगमगले नाही. सर्व अडचणींवर शासनाने मार्ग काढला. अडचणी आल्या. जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.’’