महावितरणाच्या देयकातील गोंधळ अद्यापही कायमच !

पुणे – एप्रिल आणि मे मध्ये ‘महावितरण’कडून घरोघरी जाऊन ‘मीटर रीडिंग’ घेणे, वीजदेयके पाठवणे बंद होते. आता दळणवळण बंदी जवळपास हटवण्यात आल्यामुळे महावितरणकडून घरोघरी जाऊन ‘रीडिंग’ घेण्यास प्रारंभ झाला असूनही एकाच इमारतीतील काही सदनिका धारकांना ‘रीडिंग’नुसार, तर काहींना अंदाजे देयक पाठवले जात आहे. अंदाजे देयक पाठवण्यात येणार्‍या ग्राहकांच्या देयकावर ‘रीडिंग’ उपलब्ध नसल्याचा शेरा नमूद करण्यात आला आहे. तसेच महावितरणने ग्राहकांच्या देयकात ‘केडब्ल्यूएच्’, ‘आर्केव्हीएएच् रीडिंग’ (वीजवापराची युनिट) अंदाजे दाखवली आहेत. (महावितरणने हा गोंधळ टाळण्यासाठी आधीच उपाययोजना करणे अपेक्षित होते. आता जनतेला झालेल्या मनस्तापाचे दायित्व कुणाचे ? – संपादक)

अनेकांच्या देयकांत ‘रीडिंग’ उपलब्ध नसल्याचे दाखवून अधिक रक्कमेची देयके पाठवल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. नागरिकांना ‘मीटर रीडिंग’चे छायाचित्र पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास तुलनेने अल्प प्रतिसाद मिळाला. भविष्यात एकूण ‘रीडिंग’ घेऊन, त्याचे एकत्रित आणि दंडासहित देयक दिल्यास ग्राहकाला भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. ‘मीटर रीडिंग’ उपलब्ध असलेल्या देयकात नमूद ‘रीडिंग’ अंदाजे आणि अधिक असल्यास त्याचाही फटका ग्राहकाला बसण्याची शक्यता आहे.