साधकांची साधनेत घसरण होऊ नये, या तळमळीने काही क्षणांच्या वर्तनावरून निरीक्षण करून त्यांना साहाय्य करणारे परात्पर गुरु डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया ही त्यांची अखिल मानवजातीसाठी फार मोठी देणगी आहे. आज प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वभावदोष आणि अहं यांमुळे स्वतःच्या जीवनातील आनंदापासून वंचित आहे. त्या आनंदाचा स्रोत स्वतःच्या अंतरातच आहे, हे पुनःपुन्हा सांगून षडरिपुंच्या गर्तेतून साधकांना बाहेर काढणे, हे त्यांच्या प्रीतीचे अत्त्युच्च टोक आहे. हे करण्यासाठी ते केवळ दुःखाचे कारण सांगून थांबलेले नाहीत, तर स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करावे, हेही त्यांनी सांगितले. साधकांकडून ते प्रयत्न सातत्याने व्हावेत, यासाठी त्याचा आढावा देण्याची पद्धत चालू केली. सनातनमध्ये घेतला जाणारा ‘व्यष्टी साधनेचा आढावा’, हे सनातनचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य आहे. साधकांना प्रेमाने, संयमाने, तर कधी साधकाची साधनेत घसरण होऊ नये, या प्रेमापोटी कठोर होऊन जाणीव करून देणारा हा आढावा, हे सनातनच्या साधकांची अत्यंत वेगाने आध्यात्मिक प्रगती होण्यामागील गमक आहे ! परात्पर गुरु डॉक्टर साधकांना कशा प्रकारे साधनेत साहाय्य करतात, त्याची काही प्रातिनिधीक उदाहरणे –

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकाच्या कृतीकडे पाहून त्याच्यात अधिक अहं असल्याचे सांगणे

एकदा काही साधक ट्रकमधील साहित्य खाली उतरवत होते. तेव्हा एक साधक तेथे नुसताच उभा होता. स्वतः काहीच सेवा न करता तो इतरांना ‘तुम्ही हे करा. तुम्ही ते करा’, असे सांगत होता. प्रत्यक्षात पुष्कळ साहित्य उतरवायचे असल्याने त्यासाठी त्यानेही हातभार लावणे आवश्यक होते. ते पाहून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘एवढे साहित्य उतरवायचे असूनही हा स्वतः काहीच करत नाही, केवळ इतरांना सांगतो. याच्यात किती अहं आहे !’’ त्यानंतर त्याच्याविषयी उत्तरदायींकडे चौकशी केल्यावर त्याच्यामध्ये ‘मी करतो तेच योग्य आहे’, असे वाटणे, स्वीकारण्याची वृत्ती नसणे, मनाने करणे, ऐकण्याची वृत्ती नसणे इत्यादी अहंचे पैलू तीव्र प्रमाणात असल्याचे समजले. यामुळे ‘अहंमुळे साधनेत पुष्कळ घसरण होते’, हे लक्षात घेऊन त्या साधकाला साधनेच्या दृष्टीने साहाय्य करता आले.’

२. ग्रंथ विभागातील साधकांना सांगूनही त्यांनी कागदांचे आकारानुसार विभाजन न केल्यामुळे त्यांना चुकीसाठी प्रायश्‍चित्त घेण्यास सांगणे

‘काही वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी ग्रंथ विभागातील साधकांना पाठकोर्‍या कागदांचे त्यांच्या आकारांनुसार (चिठ्ठी लिहिण्यास उपयोगी पडतील असे कागदाचे चिटोरे, तसेच लहान, मध्यम, मोठे आणि A4 आकाराचे कागद आदी) विभाजन करण्यास सांगितले होते. जेणेकरून लिखाणासाठी आवश्यक असणार्‍या कागदाची उपलब्धता होईल (उदा. लहान कागदाची आवश्यकता असतांना त्याच आकाराचा कागद सहजरित्या सापडेल.) आणि आवश्यक त्या आकाराचे कागद शोधण्यात साधकांचा वेळ जाणार नाही, तसेच कागदही वाया जाणार नाही. साधकांकडून तसे विभाजन झाले नसल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विभागातील सर्व साधकांना या चुकीसंदर्भात प्रायश्‍चित्त घेण्यास सांगितले होते.

३. परात्पर गुरु डॉक्टरांनी संगणक दुरुस्ती सेवेतील साधकांना एका संगणकाची केबल अव्यवस्थितपणे गुंडाळल्याची परखडपणे जाणीव करून देणे

परात्पर गुरु डॉक्टर ग्रंथलिखाणाच्या सेवेला बसतात, तेथील संगणकाची केबल अव्यवस्थित गुंडाळली असल्याचे एकदा त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी संगणक दुरुस्ती सेवेतील साधकांच्या ते लगेचच लक्षात आणून दिले आणि म्हणाले, ‘‘कोणतीही सेवा वरवर न करता परिपूर्णतेने करण्याची तळमळ असायला हवी.’’ नंतर त्यांनी त्या साधकांचा स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेऊन त्यांना वरील चुकीची जाणीव करून देण्यास सांगितले. या सत्संगामध्ये आश्रमातील अन्य काही ठिकाणीही संगणकांच्या केबल अशाच प्रकारे अव्यवस्थित असल्याचे लक्षात आल्याने नंतर त्याही व्यवस्थित करण्याचे नियोजन करण्यात आले. या प्रसंगातून साधकांवर परिपूर्ण सेवा करण्याचा संस्कार व्हावा, अशी किती तळमळ परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये आहे, ते शिकायला मिळाले.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०१४)