स्वसंघटनेच्या कक्षा भेदून हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करणारे अन् हिंदूसंघटनासाठी प्रयत्न करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्री. नागेश गाडे

‘फार वर्षांपूर्वी साधकांचे प्रबोधन करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ४ ओळींचे काव्य लिहितांना त्यात म्हटले होते, ‘मी स्थूलदेहाने सदा सर्वत्र असण्यास मर्यादा असल्याने मी ‘सनातन धर्मा’च्या रूपात सर्वत्र आहे’, असा भाव ठेवावा. कालांतराने हिंदुत्वाचे कार्य जसजसे वाढत गेले, तसतसे अनेक हिंदुत्वनिष्ठही परात्पर गुरु डॉक्टरांकडे आकर्षित होत गेले आणि आज कित्येक हिंदुत्वनिष्ठ परात्पर गुरु डॉक्टरांना ‘गुरु’स्थानी मानतात. आता आम्हाला ‘परात्पर गुरु डॉक्टर ‘सनातन धर्मा’चे आहेत’, याची ठायी ठायी प्रचीती येते. परात्पर गुरु डॉक्टरांनीही आचार-विचारांतही साधक आणि हिंदुत्वनिष्ठ, स्वतःची आणि इतरांची संघटना असा भेद कधीच केला नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनाही ते साधकांप्रमाणे मार्गदर्शन करू शकले आणि आता बरेच हिंदुत्वनिष्ठ त्या मार्गाचे आचरण करून हिंदुत्वाच्या कार्यात आणि ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गात अग्रेसर झाले आहेत. याची काही उदाहरणे सांगतो.   

– श्री. नागेश गाडे, समूह संपादक, सनातन प्रभात नियतकालिके.

डावीकडून श्रीलंकेतील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन्, बांगलादेश येथील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष आणि काठमांडू (नेपाळ) येथील ‘राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ’चे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराई या हिंदुत्वनिष्ठांशी अनौपचारिक चर्चा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले ! हिंदुत्वनिष्ठांच्या संघटनांमध्ये कार्य करतांना चढाओढ न होता प्रत्येक संघटनेचे कार्य हे आपलेच कार्य समजून सर्वांनी संघटितपणे करायची शिकवण परात्पर गुरुदेवांनी स्वतःच्या कृतीतून दिली. हिंदुत्वनिष्ठ संघटना किंवा व्यक्ती कुठलीही असली, तरी सर्वांना त्यांनी निरपेक्ष प्रेमाद्वारे म्हणजेच त्यांच्यातील प्रीतीद्वारे आपलेसे केले.

 

सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता पू. हरिशंकर जैन (मध्यभागी बसलेले) आणि त्यांच्या पत्नी सौ. उमा  यांच्या संपूर्ण कुटुंबियांसमवेत परात्पर गुरु डॉ. आठवले. उभे असलेले डावीकडून अधिवक्ता विष्णुशंकर जैन, सून सौ. डोना, नातू चि. वृषांक (आईच्या कडेवर), मुलगी सौ. वैष्णवी आणि जावई श्री. सोहम् दवे. केवळ हिंदुत्वनिष्ठांनाच नाही, तर त्यांच्या कुटुंबियांनाही आपलेसे करणारे प्रीतीचा सागर असलेले परात्पर गुरुदेव ! यांमुळे कुटुंबियांनीही साधनेला प्रारंभ केल्याने हिंदुत्वनिष्ठांनाही कार्य झोकून देऊन करण्यास बळ प्राप्त झाले.

भाषा-प्रांताच्या कक्षा भेदूनी अखंड वाहतो झरा प्रीतीचा । हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आधार तोची हिंदूसंघटनाचा ॥

‘सनातन प्रभात मुखपत्र तुमचेच आहे’, असे हिंदुत्वनिष्ठांना सांगणे

‘सनातन प्रभात’ हे ‘सनातन संस्थे’चे मुखपत्र आहे’, असे समाज समजतो; पण परात्पर गुरु डॉक्टरांनी मात्र ‘सनातन प्रभातने ‘समस्त हिंदुत्ववाद्यांचे मुखपत्र’ म्हणून कार्य केले पाहिजे’, अशी शिकवण साधकांना दिली आहे. त्यांनी भेटलेल्या प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाला सांगितले आहे, ‘सनातन प्रभात हे वृत्तपत्र तुम्ही तुमचेच समजा आणि तुमच्या संघटनेच्या बातम्या ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्धीसाठी देत जा !’ कर्नाटकमधील ‘एक संघटना’ धर्मरक्षणाचे कार्य सातत्याने आणि परिणामकारकपणे करत होती. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या संघटनेतील पदाधिकार्‍यांना सांगितले, ‘‘कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे एक पान आम्ही तुमच्या संघटनेसाठीच ठेवू. आवश्यक ते लिखाण तुम्ही पाठवा. आम्ही ते प्रसिद्ध करू.’’

हिंदुत्वनिष्ठ संकेतस्थळांत अव्वल वाचकसंख्या असलेल्या hindujagruti.org या संकेतस्थळावरही विविध संघटनांंच्या उपक्रमांच्या वार्ता नियमितपणे प्रसिद्ध केल्या जातात. हे सर्व करण्यामागे ‘हिंदुत्वनिष्ठ करत असलेल्या कार्यातील आपला छोटासा सहभाग’, असा दृष्टीकोन परात्पर गुरु डॉक्टरांनी दिला आहे.

एका संघटनेतील पदाधिकार्‍यांमधील वाद सोडवण्यासाठी साधकांना पुढाकार घेण्यास सांगणे

आसाममधील एका संघटनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये आपापसांत वाद होते. त्यामुळे संघटनेचे कार्य खुंटल्यासारखे झाले होते. हे कळल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘त्या संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत’, असे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

अडचणीत असलेले हिंदुत्वनिष्ठ किंवा संघटना यांना आधार देणे

धर्मरक्षणाच्या घटनांमध्ये ‘हिंदुत्वनिष्ठांना पोलीस आणि धर्मविरोधक यांच्याकडून मारहाण होणे, अन्याय्य अटक होणे’ इत्यादी घटना नेहमी घडत असतात. ‘अशा प्रसंगांत त्या हिंदुत्वनिष्ठांना किंवा संघटनेतील अन्य कार्यकर्त्यांना साधकांनी त्वरित स्वतःहून भेटायला जावे’, अशी शिकवण परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना दिली. ‘आपण अडचणीत असल्यावर आपल्या साहाय्याला कुणी आले, तर आपल्याला त्याचा आधार वाटतो. तसेच इतरांनाही आपला आधार वाटला पाहिजे’, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा त्यामागील दृष्टीकोन असतो. त्यामुळे एखादा हिंदुत्वनिष्ठ किंवा संघटना अडचणीत असल्याचे समजले की, ‘त्यांना कुणी भेटून आले कि नाही ?’, ‘त्यांना काही साहाय्य हवे आहे का ?’, असे परात्पर गुरु डॉक्टर आवर्जून विचारतात.

अडचणीत असलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आधार देण्याच्या संदर्भातील २ अनुभव सांगतो.

एका हिंदुत्वनिष्ठ नेत्याला कठीण काळात मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे : एका संघटनेतील कार्यकर्त्यांचे अंतर्गत वाद, संघटनेच्या कार्यकर्त्यांवर होणारा पोलिसांचा अत्याचार, विविध प्रकरणांत खटले दाखल होणे, विविध प्रांतांत प्रवेशबंदी, आर्थिक चणचण अशा विविध कारणांमुळे त्यांच्या संघटनेचे कार्य जवळजवळ ठप्प झाले होते. त्यामुळे त्या संघटनेच्या प्रमुख नेत्याला नैराश्य आले होते. त्यातून सामाजिक जीवनातून निवृत्त होण्याचे विचार त्यांच्या मनात येत होते. परात्पर गुरु डॉक्टरांना हे समजल्यानंतर त्यांनी त्यांना मानसिक आधार दिला. त्यांच्या मनाला उभारी येण्यासाठी औषधोपचार सांगितले, तसेच ‘संघटनेच्या कार्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करू’, असे सांगितले. त्यानंतरही त्यांनी अधूनमधून त्यांची आणि त्यांच्या कार्याची माहिती घेतली अन् त्यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याविषयी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या कार्यकर्त्यांना सांगितले.

एका संतांच्या भक्तांना आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन आधार देणे : एका संतांना एका आरोपाखाली अटक केल्यानंतर त्यांच्या लाखो भक्तांमध्ये निराधार झाल्याची भावना होती. त्यांच्या अटकेला ‘सनातन संस्थे’ने आणि परात्पर गुरु डॉक्टरांनीही कडाडून विरोध केला होता. त्यामुळे त्या संतांच्या काही भक्तांना परात्पर गुरु डॉक्टरांचा आधार वाटत असे. ‘अशा कठीण प्रसंगात भक्तांची श्रद्धा टिकवून ठेवून त्यांची साधना चालू रहाण्याइतका आधार देणे आवश्यक आहे’, या कर्तव्यभावनेने त्यांनी त्या संतांच्या काही भक्तांना आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन आधार दिला. सनातन प्रभात, सनातन पंचांग यांमध्ये त्या संतांविषयी छापले जाते म्हणून अनेकांनी नियतकालिके घेणे बंद केले, तसेच पंचांग घेण्याचे नाकारले, तरीही ‘या हानीपेक्षा त्या संतांच्या मागे उभे रहाणे, त्यांच्या भक्तांना आधार देणे अधिक महत्त्वाचे आहे’, हे तत्त्व परात्पर गुरु डॉक्टरांनी अंगिकारले.

हिंदुत्वनिष्ठांची ‘कुटुंबातील घटक’ असल्याप्रमाणे विचारपूस करणे

परात्पर गुरु डॉक्टर हिंदुत्वनिष्ठांची ‘कुटुंबातील घटक’ असल्याप्रमाणे विचारपूस करतात. याची अनेक उदाहरणे देता येतील.

१. एखाद्या हिंदुत्वनिष्ठाने राष्ट्र आणि धर्म यांविषयी चांगली कृती केल्यास त्याचे आवर्जून कौतुक करण्यास ते साधकांना सांगतात.

२. एखादा साधक भेटला की, ते साधक रहात असलेल्या भागातील हिंदुत्वनिष्ठांचीही आवर्जून चौकशी करतात.

३. ते कुटुंबप्रमुख असल्याप्रमाणे हिंदुत्वनिष्ठांची सर्वांगाने विचारपूस करतात आणि त्यांना आवश्यकतेनुसार साहाय्यही करतात.

छोट्या संघटनांचे कार्य वाढण्यासाठी त्यांना दिशा देऊन साहाय्य करणे

हिंदुत्वनिष्ठांना संघटित करण्याचे कार्य करत असतांना काही छोट्या संघटनाही संपर्कात आल्या. या संघटनांतील पदाधिकार्‍यांना हिंदुत्वाचे कार्य करण्याची तळमळ होती; पण ‘कार्याची दिशा कशी असावी आणि संघटना कशी वाढवावी ?’, याविषयी ते अनभिज्ञ होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी अशा संघटनांतील पदाधिकार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही उपक्रम त्या संघटनेच्याच नेतृत्वाखाली राबवण्यास सांगितले. तसेच या पदाधिकार्‍यांना ‘कार्य कसे करायचे ?’ याचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपाय सुचवले. यात काही पदाधिकार्‍यांना आश्रमाचे व्यवस्थापन शिकण्यासाठी काही दिवस सनातन आश्रमात बोलावले, तर काही हिंदुत्वनिष्ठांना ‘हिंदु जनजागृती समिती’च्या कार्यकर्त्यांसमवेत काही दिवसांसाठी विविध ठिकाणी जाऊन ‘ते हिंदूसंघटन कसे करतात’, हे शिकण्यास सांगितले.

हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या दोन नेत्यांमध्ये असलेला वाद सोडवण्यासाठी साधकांना पुढाकार घेण्यास सांगणे

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आपापसांतील वाद हिंदूसंघटनासाठी घातक ठरतात. त्यामुळे ‘हिंदुत्वनिष्ठांनी समविचारी सूत्रांवर एकत्र येऊन धर्मरक्षणाचे कार्य करावे’, असे परात्पर गुरु डॉक्टर वारंवार सांगतात. त्यासाठी त्यांनी काही प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांमधील वाद सोडवण्यासाठी साधकांना पुढाकार घेण्यास सांगितले. बंगालमधील दोन हिंदुत्वनिष्ठ हिंदुत्वाचे परिणामकारक कार्य करत होते. पुढे काही अपसमजांतून त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यांनी एकत्रित कार्य करणे थांबवले. परात्पर गुरु डॉक्टरांना हे समजल्यानंतर त्यांनी ‘त्या दोन्ही हिंदुत्वनिष्ठांना एकत्र बसवून त्यांचे आपापसांतील अपसमज दूर करावेत आणि ‘दोघे एकत्रित कार्य करतील’, असे पहावे’, असे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.