प्रतापगडाच्या पायथ्याशी होणार ‘वीर जिवा महाले’ यांचे स्मारक !

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान भेटीच्या वेळी सय्यद बंडा याच्या जीवघेण्या वारापासून छत्रपती शिवरायांचे वीर जीवा महाले यांनी रक्षण केले. असे शूर मावळे जीवा महाले यांचे स्मारक पर्यटन विभागाच्या जागेत प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ९ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.

या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी १ कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. १० नोव्हेंबर या दिवशी प्रतापगडावर ‘शिवप्रतापदिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने गडावर लाखो शिवप्रेमी येतात. या स्मारकामुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचे महत्त्व आणखी वाढेल. वीर जीवा महाले यांच्या पराक्रमाची गाथा सर्वांपर्यंत पोचेल. ‘हे स्मारक निर्माण व्हावे’, अशी शिवप्रेमी आणि इतिहासकार यांची अनेक वर्षांपूर्वीची मागणी होती. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे स्मारक करण्याचा निर्णय घेतला आहे’, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.