वर्ष २०३५ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व बसगाड्या इलेक्ट्रिक होणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – राज्यातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणि इंधन व्ययात बचत करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २० सहस्र, म्हणजे सर्व बसगाड्या वर्ष २०३५-३६ मध्ये इलेक्ट्रिक असतील. सर्व गाड्या इलेक्ट्रिक असणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असेल. सध्या १४ सहस्र २५० या डिझेलवर चालणार्‍या गाड्या आहेत. अजून ५ सहस्र १५० इलेक्ट्रिक गाड्यांची खरेदी करणार आहोत, अशी घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली. भाजपचे सदस्य श्रीकांत भारतीय यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

*सरनाईक यांनी सांगितलेली की, महामंडळाने ‘ओलेक्ट्रा’ या आस्थापनाकडून इलेक्ट्रिक बसगाड्या खरेदी केल्या आहेत. जसजशी या बसगाड्यांची संख्या वाढेल, त्या प्रमाणात ‘चार्जिंग स्टेशन’ (भारीत करण्याची स्थळे) उभारले जातील. एकूण १७२ ‘चार्जिंग स्टेशन’ उभारण्यास सांगितले आहे. सध्या महामंडळाकडे असलेल्या ९०७ इलेक्ट्रिक बसगाड्यांची संख्या आहे. ती पहाता ३९ ‘चार्जिंग स्टेशन’ पुरेसे असून पुढील ३ महिन्यांत अजून ४५ ‘चार्जिंग स्टेशन’ उभारण्यात येतील.